कोल्हापूर - गणेशोत्सवासोबतच येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळे स्थान आहे. दरवर्षी या सणाची सर्वांनाच आतुरता लागून राहिलेली असते. यामध्ये गौरीची आपल्या घरामध्ये स्थापना करून पूजा केली जाते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळी नावे देखील आहेत. काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते. मात्र पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने गौरी पूजन असेच म्हटले जाते. हा सण नेमका काय आहे ? काय आहे याची नेमकी परंपरा ? याबाबत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट...
'अशी' आहे गौरी सणाची परंपरा - मूर्ती आणि मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांची प्रतिक्रिया असे केले जाते गौरीचे जोरदार आगमन -
मूर्ती आणि मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात गौरी गणपती हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. खरंतर गौरी आणि गणपती हा दोन माता पुत्रांचा सण. महिलांना तर गौरी सणाची आतुरता लागून राहिलेली असते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असा हा सण आहे.
तीन दिवस माहेरवाशीण म्हणून गौरी येतात -
या सणाच्या प्रांतवार अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती म्हणतात. कोकणात सुद्धा गौरी सण म्हणूनच ओळखतात तर विदर्भात महालक्ष्मी नावाने हा सण साजरा केला जातो. मात्र ही गौरी गणपती सोबतच येत असते. त्यानुसार गौरीच्या मुखवट्यांची पूजा केली जाते. त्याला सुंदर साडी नेसवून विविध अलंकार घालून सजवले जाते. तीन दिवस घरामध्ये माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरी सणाला अतिशय महत्व आहे.
गौरी आणि महादेवाची मूर्ती 'अशी' आहे विदर्भाची परंपरा -
महिला वर्गात या सणावेळी मोठा उत्साह दिसून येतो. विदर्भात हाच सण महालक्ष्मी सण म्हणून साजरा करतात त्यात महालक्ष्मीच्या मुखवट्यांना तुळशी वृंदावणापासून अगदी वाजत गाजत घरामध्ये आणले जाते. घरातील एका सुवासिनी प्रमाणेच नटवून, सजवून त्यांच्या मुखवट्यांना स्थापन केले जाते. मग त्या येतात त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि तिसऱ्या दिवशी विविध प्रकारचा गोड नैवेद्य दिला जातो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शास्त्रामध्ये हा सण ज्येष्ठा गौरी सण म्हणून ओळखला जात असला तरी लोकांमध्ये मात्र हा माहेरवाशीणींचा सण म्हणून ओळखला जातो असेही मालेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Ganeshotsav 2021 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!