कोल्हापूर - वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून सर्वजण दिवाळीकडे पाहतात. अनेकांना दिवाळी कधी येणार याबाबत उत्सुकता असते. खरंतर दिव्यांचा, प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी साजरी करतात. त्यामुळे दिवाळीत पणत्या तसेच आकाश कंदीलला प्रचंड महत्व असते. त्यामुळे दरवर्षी विविध प्रकारचे आकाश कंदील बाजारात दाखल होत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चायनीज तसेच पर्यावरणाला हानिकारक असे आकाश कंदील येत असतात. त्यावरच उपाय म्हणून कोल्हापुरातील डीकेटीई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सौरऊर्जेवर चालणारे आकाश कंदील बनवले आहेत. यामुळे आता सण साजरे करत असताना विजेचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
सौरउर्जेवरील स्वयंचिलत आकाश कंदील असल्यामुळे विजेची होणार बचत
दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी म्हटले की, अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून आकर्षक तसेच रंगीबेरंगी आकाशदीवे लावले जातात. त्यामुळे आकाश कंदीलला मोठे महत्त्व असते. हे आकाश कंदील पारंपरिकरित्या बांबूच्या कामट्या आणि रंगीत कागदापासून तयार केले जातात. मात्र, अलिकडच्या काळात पारंपरिक आकाश कंदीलची परंपरा कमी होत असल्याचे दिसत आहे. प्लास्टिकचे, चीनी कंपनीचे आकाश कंदील बाजारात मोठ्या प्रमाणात आले आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि नैसर्गिक स्त्रोताचा वापर करत सौरउर्जेवरील आकाश कंदील तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे आकाश कंदील स्वयंचलित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या आकाश कंदीलांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आकाश कंदील 7 ते 8 तास उन्हात ठेवल्यास पुढचे 2 ते 3 दिवस प्रकाश
दीवाळी सणाचे औचित्य साधत डीकेटीईच्या आयईईई स्टूडन्ट ब्रांच आणि एआयसीटीई आयडीया लॅब अंतर्गत इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविले सौरउर्जेवरील आकाश कंदील ‘सोलारवाली दिवाळी’ या उपक्रमांतर्गत बांबूपासून सौरउर्जेवरील पारंपारिक आकाश कंदील बनविले आहेत. हे आकाश कंदील नैसर्गिक स्त्रोत्रावर म्हणजे सौरउर्जेवरील असल्यामुळे हे कंदील 8 तास सौर उर्जेने चार्ज झाल्यास 2 ते 3 दिवस स्वंयचलित प्रज्वलीत होतात. यामुळे सर्वसामन्यांची विजेची बचत होणार आहे.
आकाश कंदीलला केवळ 300 रुपयांचा खर्च
हे कंदील पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनविलेले असून या कंदीलासाठी केवळ 300 रुपये खर्च अपेक्षित असून ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत व दिसायला सुबक बनविलेले आहेत. तसेच याचा प्रकाश जास्त पडत असल्यामुळे यामुळे दिवाळी सणाचा आनंद द्विगणीत होणार आहे. मागील वर्षीच्या दिवाळीसाठी देखील विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवरील पणत्या तयार केल्या होत्या. यावर्षी सोलार आकाश कंदील बनविले असून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हे आकाश कंदील बनविण्यासाठी यांनी घेतला पुढाकार
आशिष पंजवाणी, संदेश पंतोजी, ज्ञानदा मिरजकर, उम्मेमिस्बाह भिस्ती, पंकज नलावडे, मेधावी पाटील, अमृता मुळे, मिस्बा बेटगरी, आशुतोष धनलशन्ख, अनुजा पिसे, विश्वजा कोलखुम्बे, ऐश्वर्या आडके, सुहास शिखरे, प्राची वर्खल नेहा भस्मे, प्रतिक्षा चौगुले, धनश्री निकम, सबीर संदे, अजित जाधव या विद्यार्थ्यांनी हे आकाश कंदील बनविण्यासाठी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांच्या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देत सर्वसामान्य नागरिकांची दरवर्षी दीपावली आणखी कशी गोड करता येईल याबाबत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दरम्यान, आकाश कंदील तयार करण्यासाठी संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, डॉ. एल. एस. आडमुठे, डॉ. आर. एन. पाटील, प्रा. डी. जी. पाटील, प्रा. एस. ए. वडेकर व प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.
हे ही वाचा -Green Crackers : कोल्हापूरकरांचा 'ग्रीन क्रॅकर्स' खरेदीकडे कल; यंदा मोठी उलाढाल