कोल्हापूर - कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर शंका उपस्थित केली आहे. अशाप्रकारचा निर्णय कोर्टाकडून देण्यात येणार याची कालच कल्पना आली होती. त्यामुळे एकप्रकारे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सरकारच बोलत आहे काय, असा संशय येत असल्याचेही शेट्टींनी म्हटले आहे. ज्यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे, त्यांची समिती स्थापन केली आहे आणि ते आता कोर्टाला काय वेगळे सांगणार आहेत, असा सवाल करत लवकरच आम्ही देशातील सर्वच शेतकरी नेते एकत्र बसून पुढील निर्णय जाहीर करू, असेही शेट्टींनी स्पष्ट केले आहे.
'व्यापक कटाचा भाग आहे की काय?'
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कायदे पूर्णपणे मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्याचबरीबर हमीभावाचा कायदा नवा करण्याची मागणी होती. सुप्रीम कोर्ट या हमीभावाबाबत काहीच बोलायला तयार नाही. शिवाय ज्यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे, त्याच लोकांची समितीमध्ये नावs आहेत. त्यामुळे आमच्या मनामध्ये हा व्यापक कटाचा भाग आहे की काय, अशी शंका येत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
'हा शेतकऱ्यांचा अपमान; सर्व शेतकरी नेते यावर निर्णय घेतील'
गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायदे रद्द झाले पाहिजे, अशी मागणी केले होती. मात्र कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन थांबवावे आणि आपापल्या घरी जावे, असे सरकारला वाटत असेल तर आता शेतकरी ऐकतील असे वाटत नसल्याचे शेट्टींनी म्हटले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर आम्ही देशभरातील सर्वच शेतकरी नेते एकत्र बसून चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.