कोल्हापूर : साखर उत्पादनात अनेक वेळा उत्तर प्रदेशचीच मक्तेदारी पाहायला मिळायची. मात्र, सर्व रेकॉर्ड मोडत आता महाराष्ट्राने आणि विशेष म्हणजे एकट्या कोल्हापूर विभागाने राज्यात बाजी मारली आहे. राज्यातील एकूण उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. असे असले तरी कोल्हापुरातील ऊस उत्पादनात झालेल्या या विक्रमी वाढीची नेमके काय कारणं आहेत? ऊस उत्पादनाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी का वळले आहेत? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून...
कोल्हापूर विभागाच्या यावर्षीच्या ऊस उत्पादनावावर एक नजर :कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक ए. व्ही. गाडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर विभागात 2 लाख 86 हजार 237 हेक्टर इतक्या क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी 2020-21 मध्ये कोल्हापूर विभागात 2 कोटी 31 लाख 8 हजार 558 मेट्रिक टन इतके उसाचे गाळप झाले होते तर 2 कोटी 77 लाख 38 हजार 106 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. खरंतर दरवर्षी कोल्हापूर विभाग 2 कोटी मेट्रिक टनाहून अधिकचे उत्पादन घेत असतो आणि इथला उतारा सुद्धा जवळपास 12 टक्के असतो. मात्र, यामध्ये यावर्षी मोठी वाढ झाली असून आजपर्यंत 2 कोटी 53 लाख 80 हजार 406 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून 2 कोटी 99 लाख 15 हजार 798 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने देशातच नव्हे तर इतर महत्वाच्या देशांच्या तुलनेत कोल्हापूर विभागाने अव्वल स्थान पटवकावले आहे. कोल्हापूर विभागात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये खासगी आणि सहकारी असे मिळून एकूण 41 कारखाने असून त्यापैकी 23 कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. राज्याच्या एकूण उत्पादन तसेच गाळपात कोल्हापूर जिल्हाच अव्वल स्थानी आहे.
का वाढत आहे इतके ऊस उत्पादन? :इतर पिकांच्या तुलनेत काही प्रमाणात कमी कष्टाची शेती आणि हमखास हमीभाव असलेले पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. 12 महिन्यांचे हे पीक आहे. इतर कोणत्याही पिकाला हमीभाव नाही त्यामुळे सर्वच शेतकरी या पिकाकडे वळला आहे आणि विशेष म्हणजे याचा आलेख आता वाढतच चालला आहे. ऊस शेतीला इतर शेतीच्या तुलनेत अधिक पाणी लागते आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाणीची उपलब्धता सुद्धा आहे. त्यामुळे शेतीला बारामाही पाणी उपलब्ध असते. शिवाय शेतकरी विविध पिकं घेत असतात मात्र त्याला कधी बाजारपेठ उपलब्ध होते कधी होत नाही. ऊस शेतीचे असे होत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकार जाळे पसरले असून 20 हुन अधिक साखर कारखाने आहेत. अनेक साखर कारखाने एफआरपी पेक्षाही अधिक दर देतात हा सुद्धा अनुभव आहे.
देशातील साखरेचे सध्यस्थीतील गणित :देशात यावर्षी साखरेचे उत्पादन वाढले आहे. सद्यस्थितीत 290 लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले असून त्यापैकी 250 ते 260 मेट्रिक टन इतकी साखरेची देशाला गरज आहे. त्यापैकी सुद्धा केवळ 30 टक्केच साखर घरगुती वापरासाठी वापरली जाते इतर साखर ही उद्योगांसाठी लागते. शिवाय सरकारने सुद्धा आता इथेनॉल निर्मितीकडे वळण्याबाबत सूचना दिल्या असून येत्या 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल निर्मितीकडे वळणार असल्याचे म्हंटले आहे. सद्यस्थितीत केवळ 10 टक्क्यांपर्यंत इथेनॉल निर्मिती सुरू आहे. 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल उत्पादन होईल मात्र या दरम्यान च्या कालावधीत काय करायचे हा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. जास्तीचे उत्पादन नेहमीच कारखामदारांसाठी अडचणींचा प्रश्न असतो. अशा वेळी जास्तीत जास्त साखर निर्यात करण्याचे सरकारने निर्णय घेतले पाहिजे. यावर्षी सुद्धा बऱ्यापैकी साखर निर्यात झाली असून त्याचा कारखानदारांना जरी फायदा होणार असला तरी प्रत्यक्षात मिळणारा दर हा 31 ते 32 रुपये इतका असून तो खुपच कमी आहे. शिवाय साखरेला जो हमीभाव दिला आहे त्यामध्ये सुद्धा हळूहळू वाढ केली पाहिजे तरच साखर कारखान्यांना चांगले दिवस येतील असेही अभ्यासक सांगतात.
कोल्हापूर विभागातील टॉप 5 साखर कारखाने :कोल्हापूर विभागात सांगली तसेच कोल्हापूर हे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात एकूण 41 कारखाने आहेत. त्यातील 29 कारखाने सहकारी तर 12 कारखाने खाजगी आहेत. यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारे तसेच सर्वाधिक गाळप केलेले कारखाने पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये देशात सर्वाधिक साखर उत्पादन तसेच गाळप करणाऱ्या साखर करखान्यामध्ये सुद्धा कोल्हापूरातल्या इचलकरंजीमधील जवाहर साखर कारखान्याचा नंबर लागला आहे. 1) जवाहर साखर कारखाना इचलकरंजी, 2) तात्यासाहेब कोरे साखर कारखाना वारणानगर, 3) श्री. दत्त साखर कारखाना, शिरोळ, 4) दालमिया भारत शुगर, आसूर्ले-पोर्ले, 5) श्री. छत्रपती शाहू कारखाना असे पहिल्या पाच क्रमांकाचे राज्यातील कारखाने आहेत.