कोल्हापूर -राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक असे राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या राज्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी मोठे काम केले आहे. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या अनेक कामांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकहितवादी आणि खरे समाजसुधारक म्हटले जाते. जेमतेम 48 वर्षे त्यांचे आयुष्य होते. मात्र कोल्हापूरचे छत्रपती झाल्यानंतर त्यांच्या अवघ्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या अफाट कार्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आदी क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून गेला. शिवाय बहुजन समाजाच्या उन्नतीसाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. शाहू राजांच्या याच अमूल्य योगदानावर प्रकाश टाकणारा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट.
यशवंतराव घाटगे ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज -राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलमधील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांच्या आई आनंदीबाई यांनी घाटगे घरण्यातून यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले. 17 मार्च 1884 साली त्यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू ठेवले. पुढच्या दहा वर्षांनी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला आणि ते कोल्हापूरचे छत्रपती बनले. राज्यारोहणानंतर 1922 पर्यंत 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. याच दरम्यान त्यांनी कोल्हापूर संस्थानासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले.
लोकांच्या अज्ञानानावर एकच उपाय म्हणून राजर्षी शाहूंनी बहुजनांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले -राजर्षी शाहू महाराजांनी गादीवर येण्यापूर्वी आपल्या राज्याचा दौरा करून संपूर्ण पाहणी केली. या दरम्यान त्यांना राज्यात वर्णव्यवस्था आणि जातीसंस्था यांचा समाजात जास्त प्रभाव असल्याचे निदर्शनास आले. शिवाय दारिद्र्य सुद्धा प्रचंड दिसून आले. हे सर्व अज्ञानामुळे झाले असल्याने एकावर एकच उपाय म्हणून त्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. पुढे जाऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आणि अमूल्य असे योगदान दिले आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. शिक्षणाबद्दल त्यांच्या असलेल्या आस्थेची अनेक उदाहरणे आहेत. मोफत सक्तीचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढून अनेक शाळा काढल्या. कोल्हापुरातील चिखली या गावात महाराजांनी सर्वात पहिली प्राथमिक शाळा सुरू केली. मुली सुद्धा शिकल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. एवढेच नाही तर, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी थेट पालकांनाही दंड करायला सुरुवात केली. त्यामुळे पालक सुद्धा दंड कोठून भरायचा म्हणत आपापल्या मुलांना शाळेत पाठवू लागले. शिक्षणाबद्दल शाहू महाराजांनी दिलेले हे योगदान स्वातंत्र्यपूर्व काळात खूपच महत्वपूर्ण ठरले, ज्यामुळे मुलांनाही शिक्षणाची गोडी लागली आणि त्याचे महत्व सुद्धा समजू लागले आणि हळूहळू समाजात बदल घडू लागला.
26 जुलै 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी राखीव जागांचा कायदा केला -राजर्षी शाहू महाराजांनी 1902 सालच्या कार्यकाळात परदेश दौरे करून तिथल्या एकूणच परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर कोल्हापूर संस्थानात परत आल्यानंतर त्यांनी अनेक सुधारणांमध्ये हात घालून बदल सुरू केले. 26 जुलै 1902 मध्ये त्यांनी राखीव जागांचा कायदा केला. हा कायदा प्रामुख्याने मराठा, कुणबी, दलित समाजातील नागरिकांसाठी बनवला आणि नोकरी तसेच शिक्षणात यांना आरक्षण दिले. समाजातील मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक प्रयत्न केले. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे, असेल तर त्यांना आरक्षण दिले पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून आरक्षण दिले होते. त्याला अनेकांचा विरोधही झाला. मात्र आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले. बहुजन समाजातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करत खऱ्या अर्थाने ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यामुळेच त्यांच्याकडे आरक्षणाचे जनक म्हणून सुद्धा पाहिले जाते. एव्हढेच नाही तर स्वतःच्या बहिणीचा विवाह एका धनगर समाजातील मुलाशी ठरवून त्यांनी जातीसंस्था नष्ट करण्यामध्ये स्वतःपासून सुरुवात करून समाजासमोर आदर्श घालून दिला. अस्पृश्यता नष्ट करणारे अनेक कायदे सुद्धा शाहू महाराजांनी केले.
हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी शाहू राजाने सर्वस्व पणाला लावले -सध्या देशात हिंदू, मुस्लिम प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. फक्त एका कोणत्या धर्माचा हा देश नाही, तशी भूमिका घेऊन देशाचे भले सुद्धा होणार नाही, असेही शाहू महाराजांनी म्हटले. त्यानुसार हिंदूंचा जितका या देशावर हक्क आहे, तितकाच हक्क मुस्लिम लोकांचा सुद्धा असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. कुराणचे मराठीत भाषांतर सुद्धा त्यावेळी शाहू महाराजांनी करून घेतल्याची माहिती आहे. यावरूनच हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी शाहू राजाने आपले सर्वस्व पणाला लावल्याचे दिसून येते.
वैदिक विद्यालयाची स्थापना -वैदिक महाविद्यालयची सुरुवात सुद्धा स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केली होती. त्याला कारणही तितकेच महत्त्वाचे आहे, ते म्हणजे वेदोक्त प्रकरण. राजर्षी शाहू महाराज हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड धार्मिक होते. त्यामुळेच ते प्रत्येक वेळी कार्तिक स्नानास पंचगंगा नदीच्या घाटावर जात असत. त्यावेळी एका पुरोहिताने आपण शूद्र आहात म्हणत आपल्याला वेदमंत्रांचा अधिकार नाही, असे सांगितले. त्यामुळे हा वाद पुढे वाढतच गेला. त्यानंतर आपल्या सारख्या व्यक्तीबाबत असे होत असेल, तर सर्वसामान्य बहुजनांच्या बाबतीत काय होत असेल, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे त्यांनी सर्व धार्मिक विधी, कृत्ये करण्यासाठी बहुजन समाजातील लोक सुद्धा तयार झाली पाहिजे, असा मुद्दा समोर आणला आणि वैदिक विद्यालयाची स्थापना केली. आजही कोल्हापूरमध्ये हे वैदिक विद्यालय असून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी वैदिक शिक्षण घेत आहेत.
राधानगरी धरणाची उभारणी करून हरित क्रांती घडवली -दूरदृष्टी काय असते हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले. सिंचनाचे महत्व आणि जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ओळखून त्यांनी तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूरातील भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. आजही हे धरण भक्कमपणे उभे असून पाण्याचा एक थेंब देखील गळत नाही. देशातील एकही असे धरण नाही, ज्या ठिकाणी स्वयंचलित दरवाजे आहेत. मात्र, राधानगरी धरण हे असे एक धरण आहे, ज्यामध्ये जेव्हा शंभर टक्के पाणीसाठा होतो तेव्हा त्याचे सात दरवाजे आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. आज अशा पद्धतीचे तंत्र कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजही देशासह जगभरात या धरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. कोल्हापूरचा पाण्याचा प्रश्न सोडवून त्यांनी खऱ्या अर्थाने हरित क्रांती घडवली. त्यामुळे त्यांना हरीत क्रांतीचे जनक म्हणून मुजरा केला पाहिजे.
स्वातंत्र्यलढ्यात शाहू महाराजांचा सहभाग -राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा सहभाग नोंदवला होता. ब्रिटिशांकडून पूर्वी काहीतरी कारणाने गादी, संस्थान जप्त करणे हा प्रकार होता. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी कोणालाही समजणार नाही, अशा गुप्त पद्धतीने या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवला, याचे असंख्य पुरावे असल्याचेही डॉ. जाधव यांनी म्हटले आहे. लोकमान्य टिळकांच्या मर्जीतील क्रांतिकारक गणपतराव जांबोटकर यांनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार 1903 ते 1908 सालात संभाव्य सशस्त्र युद्धासाठी टिळकांनी एक संघटना सुरू केली होती आणि मोठ्या चातुर्याने ती चालवली सुद्धा होती. त्यांच्या या संघटनेला शाहू महाराज दरवर्षी 500 रुपये पाठवत होते. त्यामुळे शाहू महाराजांचा स्वातंत्र्यलढ्यात पूर्णपणे सहभाग होता हे स्पष्ट होते.
28 वर्षांच्या राज्य कारभारात राजर्षी शाहूंचे अफाट कार्य -राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे जेंव्हा करवीर संस्थानचे अधिपती होते, तेंव्हा संपूर्ण देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या 48 वर्षांच्या आयुष्यात आणि 28 वर्षांच्या राज्य कारभारामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, जलधोरण आदी क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे. दरम्यान, शाहू महाराज यांचे 1922 साली निधन झाले आणि 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र महाराजांचे संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीत छुप्या पद्धतीने योगदान तसेच पाठिंबा राहिला आहे, असेही त्यांनी म्हटले. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांचे योगदान राहिले, मात्र शाहू महाराजांनी आर्थिक स्वरूपात सुद्धा मदत करून छुप्या पद्धतीने या चळवळींना बळ देण्याचे काम त्यांनी केले होते, असेही ते म्हणाले. एकीकडे देशात ब्रिटिशांचे राज्य होते, तरीही त्यातून आपल्या राज्यातील जनतेला सामाजिक न्याय देण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले. तर दुसरीकडे स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्षपणे काम करत असणाऱ्यांना सुद्धा ते बळ देण्याचे काम करत होते.