कोल्हापूर - कोल्हापूर दूध उत्पादक संघाची अर्थात गोकुळची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीवर कोरोनाचे सावट असताना पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा अट्टाहास का? असा सवाल ठरावधारकांनी केला आहे. त्याचा चेंडू सुप्रीम कोर्टात गेला आहे. मात्र या दोन्ही मंत्र्यांकडून गोकुळची निवडणूक होणार असल्याचे सांगितल्यानंतर ठरावधारक आक्रमक झाले आहेत. सध्या आठ ते दहा ठरावधारक कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोना बळावला तर याला जबाबदार कोण, असा सवाल ठरावधारकांनी केला आहे. त्यावर ईटीव्ही भारताचा स्पेशल रिपोर्ट...
गोकुळच्या दुधाने संपन्नता आणली-
उसाच्या गोडव्याने कोल्हापूरला श्रीमंती आणली, तर गोकुळच्या दुधाने संपन्नता आणली. शेतकरी असो की शेतमजूर, प्रत्येक उंबरठा गोकुळच्या पैशातून सजला. गावगाड्याचे चलन-वळण सुधारले तसतसे गोकुळच्या संचालक मंडळातील ऐश्वर्याच्या कथांना पाय फुटले. कालपर्यंत दुचाकीवरून रपेट मारणाऱ्या संचालकांच्या घरी अक्षरश: गोकुळ नांदू लागले. कारभाऱ्यांचे राजकारण अर्थसमृद्धीने वाहू लागले. त्यातून कोणालाही वाकवण्याची ताकद निर्माण झाली. १८०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या या संघातील लोणी मटकावण्याचा रंगीत-संगीत प्रकारची चर्चा इतकी वाढली की, विरोधकांना आयते कोलीत मिळाले. त्यातूनच राजकीय कुरघुड्या सुरू होऊन गोकुळ बचाव कृती समिती स्थापन झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० साली होणारी गोकुळ दूधसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. ही निवडणुक पुढील महिन्यात पार पडणार आहे. सध्या माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी.एन.पाटील व गोकुळचे संचालक अरुण नरके विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह चार आमदार, दोन खासदार असा सामना यंदाच्या निवडणुकीत रंगला आहे.
आठ ते दहा ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह-
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर सत्ता असावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पुढारी प्रयत्न करत असतो. जिल्ह्याच्या राजकारणाचं वारं गोकुळ दूध संघातून वाहत असते. यामुळे एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचे संचालक पद मिळावं यासाठी अनेक जण धडपडत असतात. कोरोनामुळे गेल्यावर्षी पुढे ढकललेली गोकुळची निवडणूक आता जाहीर झाली आहे. 2 मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटात ही निवडणूक कशी पार पाडायची हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आतापर्यंत आठ ते दहा ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशा परिस्थितीत ही निवडणूक पुढे ढकलावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यात कारोना महामारीचे संकट आणखी वाढू लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या रुपाने संपुर्ण राज्यात कोरोना रुग्णांचे संकट गंभीर झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. मात्र गोकुळसह राज्यातील १६ संस्थांना वगळून हा आदेश काढला आहे. एकीकडे राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी निवडणूकांना स्थगिती देतानाच दुसरीकडे गोकुळ व इतर १५ संस्थांच्या निवडणूकीचा कार्यक्रम चालूच ठेवण्यात आला आहे. याच्या विरोधात गोकुळ दूध संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू ही याचिका फेटाळण्यात आली.