कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन ठिकाणी निवडणूक लढविली आहे. त्यातील दोन्ही ठिकाणी विजय होणार असल्याचा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी येथे बोलताना व्यक्त केला. शिवाय गतवेळच्या मताधिक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येईल, असेही शेट्टी यांनी यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही जागा जिंकणार; राजु शेट्टींना विश्वास - विजय
लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. या दोन्ही ठिकाणी स्वाभिमानीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 तारखेला आहे. मतदारांच्या मनात काय आहे, हे चांगले माहीत आहे. निकालाची वाट पाहत असून मनामध्ये कसल्याही प्रकारची धाकधुक असण्याची गरज नसून, त्याचा काहीच फरक पडणार नसल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
खासदार शेट्टी म्हणाले, सगळीकडे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. पण काही माध्यमांमध्ये असे वृत्त पसरविले जातात, जेणेकरून सट्टेबाजांना सट्टा खेळायला सोपे जावे. त्या पोलवर दोन दिवस सट्टा खेळला जाईल. सट्टा घेणारे मालामाल होतील, पण सट्टा खेळणारे बरबाद होतील. याशिवाय दुसरे काही होणार नसून जो निकाल आहे, तो तसाच लागेल असा विश्वास सुद्धा यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केला.