कोल्हापूर - कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी दोन दिवसातच पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीपासून केवळ अर्धा फूट दूर आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर राधानगरी धरण सुद्धा 98 टक्के इतके भरले आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुद्धा रात्रीपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील 75 पेक्षाही अधिक बंधारे पाण्याखाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुन्हा एकदा महापुराची भीती व्यक्त केली जात आहे.
मुसळधार पाऊस सुरू -कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण 100% भरला असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज पहाटे 5 च्या सुमारास गेट क्रमांक 6 उघडला असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडे होऊ लागली आहे. यामुळे प्रशासन ही अलर्ट झाले असून खबरदारी म्हणून नदीकाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पहाटे धरणाचे 6 क्रमांकाचा दरवाजा उघडला - राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या 100 टक्के भरला असल्याने धरणाला असलेले स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत आज पहाटे 5 च्या सुमारास दरवाजा क्रमांक 6 उघडला असून यामधून 1428 क्युसेक्स तर पॉवर हाऊस मधून 1600 असे एकूण 3028 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या नदीत सुरू आहे. धरण 100% भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात. काल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पाऊसाची नोंद करण्यात आली असून अतिवृष्टी झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज पहाटे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ लागली. नदीकाठावरील नागरिकाना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.