कोल्हापूर - कोरोनाची लस आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच ही लस केंद्रानेच विकत घ्यायला हवी होती. मात्र, खासगी कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्राने असे केले नाही. लस विकत घेणे ही केंद्राची जबाबदारी आहे. शिवाय लसीकरणात आपण खूप मागे आहोत. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिल्यास पुढचे संपूर्ण वर्षसुद्धा लसीकरणात जाणार, असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माहिती देताना माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही वाचा -Corona Update - राज्यात 1410 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू
अजूनही 90 ते 100 कोटींच्या डोसची मात्रा लागणार
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जगात अनेक देशांमध्ये 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, भारत देश यामध्ये खूपच मागे आहे. मोठा गाजावाजा करत शंभर कोटींचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या अजूनही खूप कमी आहे. ज्या वेगाने लसीकरण सुरू आहे, त्या वेगाने अजून खूप उशीर लागणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. शिवाय अजूनही 90 ते 100 कोटी डोसची मात्रा लागणार आहे. जर, तिसऱ्या डोसबाबत निर्णय झाला तर, यामध्ये अजूनही उशीर होणार आहे, असेही चव्हाण यांनी म्हंटले.
जाहिरातबाजी थांबवा, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, जगातील कोणत्याही देशाने कोरोना प्रमाणपत्रावर राष्ट्राध्यक्षांचा फोटो लावलेला नाही. मात्र, आपल्या येथे सर्व ठिकाणी फोटो लावले जातात. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी स्वतःची एवढी जाहिरात केलेली नाही. एखाद्या महामारीमध्ये लसीकरण करणे, लोकांची काळजी घेणे, ही केंद्राची जबाबदारीच आहे. यामध्ये जाहिरातबाजी का? असा सवाल करत ही जाहिरातबाजी तत्काळ थांबवावी, शिवाय लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढावा, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
विकासदर घसरत चालला आहे
चव्हाण पुढे म्हणाले, मोदी सरकारच्या काळात प्रत्येक तिमाहीमध्ये विकास दर घसरत चालला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर भरमसाठ कर वाढवून केंद्र सरकार सरकार चालवत आहे. शिवाय जगात उपासमारीच्या यादीत भारताचा 116 देशांत 101 नंबर आला आहे. यामध्ये सुद्धा दुर्लक्ष सुरू असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
शेतकाऱ्यांबद्दल केंद्राचे घमेंडखोरीचे वर्तन योग्य नाही
कृषी कायद्यांमध्ये बदल करायला अद्याप केंद्र सरकार तयार नाही. 600 पेक्षाही जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. शेतकऱ्यांबद्दल घमेंडखोरीचे वर्तन योग्य नाही. शेतकऱ्यांचे काहीच ऐकायचे नाही, असे केंद्राचे सुरू आहे, हे चालणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हेही वाचा -मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप; अडीचशे डबेवाल्यांना सायकल वितरित