कोल्हापूर - चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापुरात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटाचा पराभव झाला आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांवर जोरदार टोलेबाजी केली. गल्ली, गाव, तालुका आणि जिल्हा सांभाळून पुढे गेले पाहिजे. अन्यथा पराभवासारखी अवस्था होते. उद्या भाजपचेच नेते चंद्रकांत पाटील यांना म्हणतील दादा, तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
मुश्रीफ म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. यावरूनच महाविकास आघाडीचा कारभार नागरिकांना आवडला आहे. हे स्पष्ट दिसत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान-
यंदा प्रथमच निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती. त्याला या प्रकारामुळे लगाम बसला आहे. निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केल्याची घोषणा केल्यामुळे यंदा मतदानाची आकडेवारी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.