महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऑक्सिजन न मिळाल्याने कोल्हापुरात माजी सैनिकाचा मृत्यू

ऑक्सिजन न मिळाल्याने कोल्हापूरात माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सविस्तर पंचनामा सुरू असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी म्हंटले आहे.

Kolhapur ex-servicemen die due to lack of oxygen
ऑक्सिजन न मिळाल्याने कोल्हापूरात माजी सैनिकाचा मृत्यू

By

Published : May 1, 2021, 4:53 PM IST

कोल्हापूर -ऑक्सिजन न मिळाल्याने कोल्हापूरातील एका माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरातील महालक्ष्मी रुग्णालयात ही घटना घडली असून या घटनेची चौकशी सद्या सुरू आहे. दरम्यान, संबंधित रुग्णालयाला गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. मात्र, रुग्णालया कडून ऑक्सिजनचे मॅनेजमेंट करण्यामध्ये, जम्बो सिलेंडर बदलण्यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यानुसार सविस्तर पंचनामा सुरू असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी म्हंटले आहे.


नातेवाईकांची रुग्णाला वाचविण्यासाठी धडपड -
संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला कोल्हापुरातील महालक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याबाबत सांगितले होते. नातेवाईकांनी सुद्धा अनेकांना फोनाफोनी करून तसेच धावपळ करून 2 इंजेक्शन उपलब्ध केली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सुद्धा नियंत्रण कक्षाकडून दोन इंजेक्शन उपलब्ध केली होती. त्यानंतर रुग्णाची प्रकृती ठीक झाली होती. ऑक्सिजन लेवल सुद्धा सुधारली होती. मात्र, आज सकाळी अचानक ऑक्सिजन नसल्यामुळे आमच्या रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला, असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. दरम्यान, जे कोणी दोषीं असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा नातेवाईकांनी केली आहे.

हॉस्पिटलला दिला होता पुरेसा साठा; पंचनामा सुरू -
माजी सैनिकाचा ऑक्सिजन मिळाला नसल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे आणि कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांनी स्वतः संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयामध्ये शुक्रवारी 30 एप्रिलला दाखल रुग्णांनुसार पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. मात्र, पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी ऑक्सिजनचे मॅनेजमेंट करण्यामध्ये, जम्बो सिलिंडर बदलण्यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत असल्याचे सांगत रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार पंचनामा करून चौकशी करत असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्जेराव कुरणे यांची युद्ध सरावावेळी तीन बोटं तुटली होती -
मृत सर्जेराव कुरणे एक जिगरबाज माजी सैनिक होते. त्यांची युद्धासरावावेळी तीन बोटे तुटली होती. त्यातून ते बरे झाले होते. या घटनेनंतर त्यांच्या डोळ्यालाही इजा झाली होती, अशी नातेवाईकांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, आज या जिगरबाज माजी सैनिकाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा सामाजिक कार्यकर्ते तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details