कोल्हापूर - राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण नियमावली बनविण्यात येणार असून कडक निर्बंधसुद्धा आता घातले जाणार आहेत. शिवाय मंदिरातील दर्शनाची वेळसुद्धा कमी करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
मंदिरातील एक दरवाजा बंद करण्यात येण्याची शक्यता
कोणाचा वाढता प्रसार लक्षात घेता अंबाबाई मंदिरातील एकूण दोन दरवाजांमधून भक्तांना मंदिरात सोडले जात आहे. मात्र त्यापैकी एखादा दरवाजा बंद करण्यासंदर्भातसुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. शिवाय कशा पद्धतीने आणखी निर्बंध घालून कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याचीसुद्धा चर्चा होणार असून याबाबत आजच निर्णय होणार आहे.
अंबाबाई दर्शनाची वेळ कमी होण्याची शक्यता
लॉकडाऊननंतर आई अंबाबाईचे हजारोंच्या संख्येने भक्तांनी दर्शन घेतले आहे. मात्र आजपर्यंत यामध्ये एकाही भक्ताला किंवा मंदिरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली नाही. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होण्याची शक्यता आहे. आज याबाबत देवस्थान समिती निर्णय घेणार आहे.