कोल्हापूर - कोरोनावरील लस सर्व नागरिकांना मोफत मिळाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. ही लस मोफत द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारने याला परवानगी नाही दिली तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चितपणे लस मोफत देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाबाबत निर्णय-
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजार ५०० जणांची नोंदणी झाली आहे. आज जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन चाचणी सुरू केली आहे. पुढच्या टप्प्यात इतर कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लस देता शक्य होणार आहे. जिल्ह्याची संपूर्ण तयारी झाली आहे. केंद्र व राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. परवानगी मिळताच लसीकरणाला सुरुवात केली जाईल. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.