कोल्हापूर- नदी ओढ्यावर बांधकाम करत असताना कोणाचे भले होते हे पाहू नका, रेड झोन मध्ये बांधकामाचे नियम कडक केले पाहिजेत, जनतेचा विचार केला पाहिजे. मात्र, याला आडकाठी येत असेल तर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची संभाजीराजे छत्रपती यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मदत कार्यात येणाऱ्या अडथळ्यावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यातील महामार्ग ग्रीन कॉरिडॉर असावेत, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करावी - खा.संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर शहरात दरवर्षी महापूर येत राहणार, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शाश्वत विकास केला पाहिजे. धरणातील नदीतील आणि ओढ्यातील गाळ, वाळू काढला पाहिजे. अनधिकृत बांधकाम टाळली पाहिजेत. नदी नाल्यावरील बांधकामाचे नियम कडक केले पाहिजेत, असे मत देखील संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरमध्ये अनेक भागात पूर आला आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी संभाजी छत्रपती आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. सरकार आणि प्रशासन अॅलर्ट होतं. त्यामुळे 2019मध्ये कोल्हापूरमध्ये जी हानी दिसली ती आता दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की पुढच्या वर्षीच्या पुराची वाट पाहावी. यावर तोडगा काढण्यासाठी आपले हायवे ग्रीन कॉरिडोअर असावेत, असं संभाजी छत्रपती म्हणाले. कोल्हापूर शहरात दरवर्षी महापूर येत राहणार, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शाश्वत विकास केला पाहिजे. धरणातील नदीतील आणि ओढ्यातील गाळ, वाळू काढला पाहिजे. अनधिकृत बांधकाम टाळली पाहिजेत. नदी नाल्यावरील बांधकामाचे नियम कडक केले पाहिजेत. दर वर्षी ही परिस्थिती येत राहणार. त्यामुळे वर्षभर आपत्ती संदर्भात कमिटी स्थापन झाली पाहिजे, असे मत देखील संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
रायगडातील हानीबद्दल दु:ख वाटते-
कोल्हापुरातील महापुरा बाबत केंद्र सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करू, तसेच संसदेत देखील याबाबत माहिती देऊ. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या हातात जे आहे ते त्यांनी केले पाहिजे. दरवर्षी केवळ मदतच मागत बसायचं का? असा सवाल देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
रायगड मधील हानी बद्दल दुःख वाटते. या दुर्घटनेत जे मृत्युमुखी पडले त्यांना संभाजीराजेंनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. ओला दुष्काळ जाहीर करत असताना त्याचे पैसे जनतेला मिळतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या पावसामुळे राज्यातील अनेक गड-किल्ल्यांवर बुरूज ढासळले आहेत. जमीन खचली आहे. प्रचंड हानी झाली आहे. मात्र आपलं दुर्दैव आहे. कारण पुरातत्व विभागाचे कायदे कडक आहेत. त्यामुळेच मला रायगडची भीती वाटत आहे. पण पुरातत्व विभागाच्या कायद्यामुळे काहीच करता येत नाही, अशी खंत देखील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.