कोल्हापूर -कोल्हापुरात इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या इंधन दराला कंटाळून अनेक महिला आता गॅस कनेक्शन बंद करून पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आता शेणी (गोवऱ्या) आणि मातीच्या चुली भेट दिल्या आहेत. कोल्हापुरातील जनसंघर्ष सेनेच्या वतीने दरवाढीच्या विरोधात अशा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. येथील शनिवार पेठ पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे या शेणी आणि चुली सुपूर्द करण्यात आल्या.
'...अन्यथा उज्ज्वला योजनेचे फलक फाडू'
इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करताना जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसचे दर स्थिर असताना केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही फसवणूक असून लॉकडाऊन, कोविड निर्बंधांमुळे जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सरकारने केलेल्या गॅस, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या तोंडावर महागाईला फोडणी दिल्याने आठ महिन्यात तब्बल 28 टक्के दरवाढ झालेली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन मोफत दिल्याची जाहिरात करणाऱ्या केंद्र सरकारने येत्या काही दिवसात ही अन्यायी दरवाढ रद्द न केल्यास पेट्रोल पंपावरील फलक फाडण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जनसंघर्ष सेना जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, लहुजी शिंदे, सतीश कदम, अनिकेत मस्कर सुनील थोरवत, प्रथमेश पोवार, प्रणव नागवेकर, विराज पाटील, गौरव पाटील आदी उपस्थित होते.
अधिकारी-कर्मचारी चक्रावले
यावेळी इंधन दरवाढीचा अनोखा निषेध करत जनसंघर्ष सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेणी आणि मातीच्या चुली घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले. यावेळी पोस्टमधील काही कर्मचारी आणि अधिकारीही काही वेळ चक्रावले आणि या वस्तू कशा पाठवायच्या हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. काहींनी या वस्तू स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी जनसंघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाचीसुद्धा झाली. शेवटी आम्हाला या वस्तू पाठवायच्याच आहेत म्हणत त्या वस्तू पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.