कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरसंगी (ता.आजरा) येथील शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून मोठं नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 40 एकरातील ऊस जळून खाक झाला असून जवळपास 15 लाखाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आज बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार -
आजरा तालुक्यातील शिरसंगी गावातील शेतकरी नागोजी आप्पा कांबळे यांच्या शेतात बाबूंचे बेट आहे. त्या ठिकाणाहून महावितरण कंपनीची विद्युत वाहक तारा गेल्या आहेत. या ठिकाणी विद्युत तारांचे घर्षण होवून सुरुवातीला बांंबूच्या बेटाला अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले आणि याची ठिणगी ऊसाच्या फडामध्ये सुद्धा पडली. भर दुपारी उन्हात ऊसाला आग लागल्याने आगीचे लोट दुरवर पसरत गेले. येथील विविध शेतकऱ्यांचे ऊसाचे फड एकमेकाच्या रानाला लागून असल्याने जवळपास साडे चारशे टनहुन अधिक ऊस आगीमध्ये खाक झाला.