कोल्हापूर : कोल्हापुरातील एका वृद्ध दाम्पत्याने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या ( Elderly couple commit suicide ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीर्घ आजाराला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून विशेष म्हणजे दोघांनीही रात्री एकत्रच रंकाळ्यात उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवटही सोबतच केला आहे. धोंडीराम बळवंत पाटील (वय 80) आणि विजयमाला धोंडीराम पाटील (वय 75) अशी मृत दाम्पत्याची नाव आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
अनेक दिवसांपासून दीर्घ आजाराला त्रस्त -
कोल्हापुरातल्या महाडिक वसाहत येथील धोंडीराम बळवंत पाटील आणि विजयमाला धोंडीराम पाटील दोघेही आपल्या परिवारासह राहत होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी इथलं घर विकून ते पाटोळेवाडी येथे राहायला आले. गेल्या काही दिवसापासून ते इथेच राहत होते. याच दरम्यान दोघांनाही दीर्घ आजार होता. त्यामुळे त्यांच्या औषधांचा खर्च होता. त्यामुळे दोघेही वैतागले होते. सतत या गोष्टीचा विचार सुरू असायचा. काल सोमवारी सुद्धा आपल्या राहत्या घरातून दोघेही रंकाळा येथे फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. रंकाळा येथे काही काळ बसल्यानंतर दोघांनीही सोबतच रंकाळ्यामध्ये उडी घेत आपला जीव दिला. आपला इतर कोणालाही त्रास नको या भावनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, या घटनेची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.