कोल्हापूर - कोल्हापूरातील कणेरीमठ येथील गुरुकुल विद्यालयातील विध्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक आणि चक्क गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्यात येत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी एक- दोन नव्हे तर तब्बल 7 ते 8 हजार मूर्ती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापराव्यात असा संदेश त्यांनी दिला आहे. शिवाय या गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर त्यापासून खत सुद्धा मिळू शकते. त्यामुळे याचा वापर करावा, असे गुरुकुल विद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अशी साकार झाली शेणापासून गणेशमूर्ती -प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची संख्या वाफहात असल्याने दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याबाबत आवाहन केले जाते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी मातीचा अनेकजण वापर आहेत. मात्र, सिद्धगिरी मठावर हजारांवर जनावरे आहेत. त्यामध्ये गाईंचे प्रमाण सुद्धा खूप आहे. त्यामुळे याच देशी गाईंच्या शेणाचा उपयोग मूर्ती निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, ही संकल्पना सुरुवातीला समोर आली. त्यानुसार गुरुकुल मधील विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्याबाबत निर्णय झाला. त्यानुसार या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला गाईचे शेण पूर्णपणे वाळवले जात आहे. वाळलेले शेण नंतर फोडून ते मातीच्या रुपात बारीक केले जाते.
किसान विघ्नहर्ता नाव देण्यात आले -एका मोठ्या चाळणीमधून बारीक मातीच्या रुपात मिळालेले शेण पुढच्या प्रक्रियेसाठी जाते. या मातीच्या रूपातील शेणामध्ये गवारगम मिसळून त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळले जाते. पाण्याने हे मिश्रण एकजीव करून त्याचे गोळे बनवले जातात. पुढे गणेशमूर्ती ज्या मोल्डिंगमध्ये बनविल्या जातात. त्यामध्ये हे गोळे घालून त्याच्यापासून सुंदर मूर्तीत रूपांतर होते. त्याला पुढे अनेक नैसर्गिक रंगांचा वापर करून अधिक सुंदर बनविले जाते. या मूर्ती अगदी मातीच्या मूर्ती असल्याच्या जाणवतात. शिवाय याचा पर्यावरणाला सुद्धा कोणताही धोका नसून उलट पर्यावरणासाठी तसेच शेतकऱ्यांना तर खत म्हणून विसर्जनानंतर वापरता येऊ शकते, असे गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी यांनी सांगितले आहे. याला "किसान विघ्नहर्ता" असे नाव देण्यात आले आहे.