महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

By

Published : Jul 30, 2021, 1:53 AM IST

Updated : Jul 30, 2021, 2:03 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 जुलै) कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/कोल्हापूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 जुलै) कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी केली. तसेच स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर ज्या उपाययोजना तत्काळ करण्यात येतील त्यासंबंधी निर्देशही दिले होते.

  • पाणी ओसरले नसल्याने पंचनाम्यासाठी वेळ -

राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे. अद्यापही कोल्हापूर, सांगली भागांमधून पाणी ओसरले नसल्याने पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून मदतीची घोषणा केली जाणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये काही घोषणा करणार आहेत का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा -विरारमधील ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न; महिला मॅनेजरची चाकूने हत्या

  • असा असणार मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा -

मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता विमानाने मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहेत. सकाळी 10 वाजता ते कोल्हापुरात पोहचतील. त्यानंतर साडेअकरा वाजता शिरोळ येथील नरसिंह वाडी येथे पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता कोल्हापूर शहरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. दुपारी 2 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

  • 26 जुलैचा कोल्हापूर दौरा झाला होता रद्द -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 26 जुलैला कोल्हापूरचा दौरा करणार होते. मात्र, खराब वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोल्हापूर भागापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांना मुंबईकडे हेलिकॉप्टरने परतावे लागले होते. त्यानंतर आता आज (30 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात येऊन पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.

  • शेतीचं सुमारे 66 कोटींचे नुकसान -

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचे सुमारे 66 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.

हेही वाचा -पूरग्रस्तांना अधिकच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणू - देवेंद्र फडणवीस

  • ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचा आज कोल्हापूर दौरा

महावितरण वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापूर व सांगली येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज, 30 जुलै रोजी या परिसराचा दौरा करणार आहेत. डॉ. राऊत हे सकाळी 9.00 वाजता कराडहून सांगलीकडे प्रयाण करतील. इथला दौरा झाल्यानंतर ते दुपारी 2.30 वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे प्रयाण करतील. कोल्हापूर जिल्ह्यातील बापट कॅम्प, नागाळा पार्क, दुधाळी उपकेंद्र येथील विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पुरग्रस्तांची विचारपूस करून गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे सायंकाळी 5.30 वाजता माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही आज कोल्हापूर दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळी 9 वाजता आंबेवाडी आणि चिखली गावातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. तेथून परत कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

Last Updated : Jul 30, 2021, 2:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details