कोल्हापूर - आज न्यायालयामध्ये तेच तेच मुद्दे पुन्हा मांडल्यामुळे तसेच न्यायाधीशांनी देखील याबाबत पुन्हा प्रश्न विचारल्याने आपली नाचक्की झाल्याचे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले आहे. यामध्ये आपण कोणतेही कर्तृत्व दाखवले नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर चिंता व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणावरील स्थगितीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. आज तरी सरकार पूर्ण तयारीने जाईल आणि स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील मराठा समाजाची होती. मात्र दुर्दैवाने आजही कोणतीही पूर्वतयारी नसल्यामुळे स्थगिती कायम ठेवण्यात आली असून 25 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. कुठलेही मंत्री हे दिल्लीमध्ये पोहोचले नाहीत. राज्याचे ॲडव्होकेट जनरल पोहोचले नाहीत आणि वकिलांना सगळ्या प्रकारचा डेटा शेअर करून अतिशय ताकदीने केस लढायला पाहिजे होती. मात्र ते लढले नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवायला कोर्टाने नकार दिला. याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो, असे पाटील म्हणाले.
समाजातील तरुण तरुणींच्या डोळ्यासमोर प्रचंड अंधार
मराठा समाजातील तरुण तरुणींच्या डोळ्यासमोर प्रचंड अंधार आहे. त्यामुळे पुढे काय होणार, असा विचार ते करत आहेत. 25 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शिवाय यामध्ये सरकारने सुद्धा पूर्ण अभ्यास करून केस लढायला हवी होती. ते आज झालं नाही.
सरकारने 'हे' काम करायला हवे होते
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी नोकरी आणि प्रवेश प्रकिया सुरू झाल्या होत्या. त्यापुरती तरी स्थगिती देऊ नका, अशी मागणी करता आली असती. आजच्या सुनावणीमध्ये खरं तरं सरकारने आपल्या वकिलांमार्फत हे काम करायला हवे. मात्र तसे झाले नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी ही 25 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी