कोल्हापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊन आज सात वर्षे पूर्ण झाली. कोरोनाचे संकट अद्याप सुरू आहे. त्यामुळे या सात वर्ष पूर्तीचा उत्सव साजरा न करता, राज्यातील, देशातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र भाजपाकडून सेवा संघटन उपक्रम म्हणून आज एक लाख गावात कोरोना योद्ध्याचे सत्कार केले जाणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात चारशे गावात उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
सांभाळून बोला - चंद्रकांत पाटील बाळासाहेब ठाकरे संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील-
संजय राऊत टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की संजय राऊत यांच्यावर मी नेहमीच बोलत आहे. मात्र, ते काय बोलणे थांबवत नाहीत. तरीही आता त्यांनी पंतप्रधान मोदींना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा तो सल्ला मी पंतप्रधानापर्यंत पोहोचवतो. पंतप्रधान त्यांची सूचना मान्य करतील. पंरतु संजय राऊत यांनी देखील हिंदूहृदय सम्राट यांच्या फोटो समोर बसावे, डोळे मिटून त्यांना विचारावे तुमचे मत काय? त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे राऊत यांना वरून थोबाडीत मारतील, असा घणाघात पाटील यांनी केला आहे.
महाविकासआघाडीने कर कमी करावेत इंधन स्वस्त होईल -
राज्यात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे, त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की जागतिक स्तरावर भाव वाढले की देशात पेट्रोलचे दर वाढतच राहतात. दर कमी करायचे असतील तर जागतिक स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र ते शक्य नाही. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले पाहिजेत, तर पेट्रोलचे दर आटोक्यात येतील. तसेच महाविकास आघाडीने सरकारने देखील शेजारच्या राज्यातील इंधन दराचा विचार करून आपल्या राज्यातील इंधनावरील कर कमी करावेत. त्यामुळे राज्यातील जनतेला इंधनदरवाढीतून दिलासा द्यावा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारला लगावला.
महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही -
महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाची जाणीव आणि गाभीर्य नाही, त्याच प्रमाणे ओबीसी आरक्षणाचे झाले. आरक्षणाचे वरवरचे प्रयत्न आहेत. सुप्रिम कोर्टाने ओबीसी आरक्षणासदर्भात मागासवर्ग आयोग नेमा, मात्र यांनी ते केले नाही, त्यामुळे न्यायालयाने वैतागून हा निर्णय दिला. म्हणजे नाक दाबल्याशिवाय यांचे तोंड उघडत नाहीत. तसेच मराठा आरक्षणातही गायकवाड आयोग न्यायालयात व्यवस्थित मांडला नाही. मात्र, आता मराठा आरक्षण प्रश्नी लोक तुम्हाला याची परतफेड करतील पंढरपूर मध्ये याची चूणूक दिसली होती. यापुढे जनता वाट पहात आहे वेळ आली की तुम्हाला तुमची जागा ते दाखवतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगवला आहे.
अजित दादा संभाळून बोला; चंद्रकांत पाटलांचा इशारा-
अजित पवार यांच्यावर उभारून बोलता येणार नाही, त्यांच्यावर सविस्तर बोलायला पाहिजे. अजित दादा झोपेत सरकार तुम्ही आणले, पवार साहेब पण झोपेतून उठायचं होते त्यावेळी तुम्ही शपथविधी पार पाडला. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचे हे अजित पवार यांना माहिती आहे. अजित पवार यांच्यासारखे दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते यांना आपण काल काय केले याची आठवण राहत नाही, त्यामुळे ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसाचे सरकार केले, त्यांच्यावर टीका करताना अजित पवारांनी विचार करून बोलावे, असे सडेतोड प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला दिले आहे.
आम्ही तुम्हाला तलवार लावून आणून उभे केले होते का? तुम्हाला आठवीस आमदार सोबत ठेवता आले नाहीत, ते पवार साहेबांच्याकडे पळून गेले. तुम्ही आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व महाविकासमध्ये उपमुख्यमंत्री, उद्या तिसऱ्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हाल, मात्र तुम्ही सर्वत्र पाहिजेत, तुम्हाला तत्व,व्यवहार , सांगड नाही, तुमचे फक्त एकच तत्व आहे, ते म्हणजे ज्याचे सरकार त्यांच्यासोबत मी जाणार अशी टीकाही पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली
संभाजीराजेंची 'ती' भूमिका आम्हाला मान्य नसेल-
मराठा आरक्षणाबाबत जे जे संघर्ष करतील, त्यांच्यासोबत भाजप असेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. 'शरद पवार असो, अजित पवार असो वा संभाजी राजे, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणीही संघर्ष करणार असेल तर त्यांचा शिलेदार म्हणून मी त्यांच्यासोबत असेन. पण, करोनाचे नाव पुढे करून संघर्ष टाळला जात असेल तर हा प्रश्न सुटणार नाही. आणखी किती दिवस शांत बसायचे,' असा प्रश्नही त्यांनी केला. 'छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका सरकारच्या बाजूची असेल तर ती आम्हाला मान्य नाही,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.