कोल्हापूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 50 उमेदवार यशस्वी झाले आहेत. या 50 विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातल्या गारगोटीमधील अल्पदृष्टी असलेल्या आनंद पाटील यांनीसुद्धा घवघवीत यश मिळवले असून देशात 322 व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आहेत. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आनंद यांचा हा संपूर्ण प्रवास अगदीच खडतर असा होता. अल्पदृष्टी असल्याने अभ्यास करताना ऑडिओ क्लिप ऐकून, नोट्स चे मोठ्या फॉन्ट मध्ये झेरॉक्स काढून त्यांनी हा अभ्यास केला. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबतच मित्रांचेसुद्धा सहकार्य लाभले. त्यांच्या या प्रवासावर एक नजर...
- लहान वयातच दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन :
आनंद पाटील यांना काहीही दिसत नसल्याचे समजताच त्यांच्या दोन्ही डोळ्यांची लहान वयातच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेंव्हापासून त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आले, त्यावरसुद्धा मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र, शिक्षण घेतानासुद्धा त्यांना शिक्षक फळ्यावर काय लिहतात हे दिसत नसायचे. त्यामुळे फळ्याशेजारी उभे राहून जे काही शिकवले आहे ते वहीमध्ये लिहून घ्यायचे. त्यामध्येसुद्धा खूप अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे इतर मित्रांच्या वही घरी घेऊन जाऊन ते आपल्यात उतरून काढावे लागे. या अडथळ्यांवर मात करत आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर हळू हळू त्यांनी मोबाईलचा वापर करायला सुरुवात केली. विविध अँप्लिकेशन चा आनंदा यांनी अभ्यासात वापर केला असल्याचे त्यांनी म्हंटले.
- आनंद पाटील यांच्या शिक्षण प्रवासावर एक नजर :
आनंद यांनी प्राथमिक शिक्षण गावातीलच नूतन मराठी हायस्कुल, गारगोटी येथे घेतले. त्यानंतर आंबोली येथील इंग्लिश पब्लिक स्कुल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मौनी विद्यापीठातील आयसीआरई मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. डिप्लोमानंतर येथील इस्लामपूरमधील आरआयटी कॉलेजमध्ये बीटेक साठी प्रवेश घेतला. 2016-17 मध्ये त्यांनी या कॉलेजमधून इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले. आनंद यांनी आपण आयएएसच व्हायचं आहे हे पहिल्यापासून ठरवलं नव्हतं. मात्र आयुष्यात पुढे जाऊन जी कोणती नोकरी करणार ती प्रामाणिकपणे पार पडायची इतकंच डोक्यात होतं असे त्यांनी म्हंटले. 2017 मध्ये त्यांनी डिग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर यूपीएससी ची तयारी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोन वेळा परीक्षा दिली. मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले. पुण्यातील एका मैत्रिणीने त्यांना मोबाईलवरील अप्लिकेशनचा वापर करण्याबाबत सल्ला दिला त्यामुळे हजार हजार पानांच्या पुस्तकाचा अल्पदृष्टी असल्याने अभ्यास करू शकत नसल्याने त्या अप्लिकेशनचा सुद्धा खूप फायदा झाला. शिवाय यु ट्यूब चा सुद्धा त्यांच्या या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे ते सांगतात. त्याद्वारे त्यांनी अनेक मोठं मोठ्या व्यक्तींचे लेक्चर ऐकले होते. जवळपास 15 ते 16 दररोज ते अभ्यास करत होते असेही आनंद पाटील म्हणाले.
- आनंद पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी; वडिलांसह दोन बहिणीसुद्धा इंजिनिअर :
आनंद पाटील यांची आर्थिक परिस्थिती स्थिर आहे. आई हाऊस वाईफ तर वडील पाटबंधारे खात्यात शाखा अभियंता पदावर रुजू होते. नुकतेच काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. ठिकाणी नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती उत्तम राहिली आहे. मात्र मुलग्याला अल्पदृष्टी असल्याने नेहमीच त्यांना आनंद यांची काळजी असायची. त्यांनी आनंद यांना आजपर्यंत शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिले नाही. आनंद यांच्यासाठी शालेय प्रवास कठीण राहिला असला तरी त्यांनी या सर्वांवर मात करत आपले ध्येय पूर्ण करत यूपीएससी परीक्षेत 325 व्या क्रमांकाने त्यांनी यश मिळविले आहे. विशेष म्हणजे आनंद पाटील यांच्या दोनही बहिणी शीतल पाटील, बीई आयटी (विवाहित) आणि नेहा पाटील, बीई मेकॅनिकल (विवाहित) इंजिनिअर आहेत. त्यामुळे आनंद यांच्या वडीलांना आपली मुलं शिकली पाहिजे याबाबत खूपच काळजी घेतली होती. त्यासाठी त्यांनी सर्वांनाच प्रथिमिक शाळेपासून चांगले शिक्षण दिले होते. आज त्यांना आयुष्यात सर्वात आनंदी दिवस असल्याचे सुद्धा म्हंटले आहे.
- यूपीएससी अभ्यास करण्याचा निर्णय कधी आणि का घेतला :
अल्पदृष्टी असतानाही शिवाय शिक्षणात त्यामुळे अनेक अडचणी आल्या होत्या तरीही यूपीएससी अभ्यास करण्याचा निर्णय त्यांनी 2017 मध्ये घेतला. यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात हे सुद्धा माहीत होते. तरीही आनंद यांनी जिद्द सोडली नाही शेवटी याचा अभ्यास सुरू ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले. याची नेमकी प्रेरणा त्यांना कुठून आली आणि नेमकं काय कारण होते याबाबत विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी यातच आपण करिअर करायचे आहे असे ठरवले नव्हते. पण जे काम चांगल्या पद्धतीने पार पडायचे एव्हढेच डोक्यात होते. इंजिनिअर झाल्यानंतर काय करायचे हा विचार होताच पण आपण यूपीएससी करू शकतो का याबाबत माहिती घ्यायला सुरुवात केली अनेकांकडून मार्गदर्शन घेतले. आपल्या अल्पदृष्टी च्या परिस्थितीत सुद्धा चिकाटीने अभ्यास करून इंजिनिअर पर्यंत आपण शिक्षण पूर्ण केले आहे. मग यामध्ये का नाही काही होऊ शकत हाच विचार ठेऊन त्यांनी याचा अभ्यास सुरू करायचा ठरविले. त्यानंतर 2017 रोजी एका संस्थेत ऍडमिशन घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर सलग दोन वेळा या परीक्षेत अपयश आले मात्र यावर्षी चांगले यश मिळाले असून देशात 325 व्या क्रमांकाने यशस्वी झालो असल्याचेही आनंद यांनी म्हंटले.
- UPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा वाचा खालील लिंकवर -
कौतुकास्पद..! धुळे जिल्ह्यातील तरुणीने यूपीएससीच्या आयएसएस परीक्षेत पटकवला चौथा क्रमांक