कोल्हापूर - कोल्हापुरातील अडीच वर्षांच्या चिमुकलीने केवळ सव्वा तीन 3 तासांत कळसुबाई शिखर सर केले ( Anvi Ghatge Climbed highest peak in Maharashtra ) आहे. अन्वी चेतन घाटगे असे या चिमुकलीचे नाव आहे. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. मुसळधार पावसात सुद्धा तिने ही कामगिरी केल्याने सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जवळपास 1646 मीटर उंच असलेले हे शिखर सर करताना मोठ्या लोकांना सुद्धा कधी कधी शक्य होत नाही, मात्र अन्वीने सव्वा तीन तासांतच हे सर केले आहे. यामुळे या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
'अन्वीची' आवड, गिर्यारोहक होण्याची -अन्वीच्या आई वडिलांनी ती लहान असतानाच तिची या क्षेत्रात असलेली आवड ओळखून यामध्ये मार्गदर्शन करण्याचे ठरवले. अन्वी सुद्धा यामध्ये दाखवत असलेली आवड पाहून त्यांनी तिला अनेक मोहिमांमध्ये सहभागी केले आहे. अन्वीची आई अनिता घाटगे यांनाही ट्रेकिंगची आवड आहे. तसेच पोलीस अंमलदार असणारे तिचे वडील चेतन घाटगे यांनाही ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. ट्रेकिंग सोबतच पर्यावरण रक्षण आणि अनेक सामाजिक कामात ते सक्रिय असतात. त्यामुळेच आपल्या चिमुकलीला त्यांनी वयाच्या 18 व्या महिन्यापासूनच ट्रेकिंगच्या अनेक संधी निर्माण करून दिल्या. तिचा यामधील सहभाग पाहून त्यांनी कळसुबाई शिखर सर करण्याबाबत विचार केला आणि तज्ज्ञ गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ही मोहीम फत्ते केली.
बारी ग्रामपंचायतीकडून सत्कार - अहमदनगर जिल्ह्यातील बारी ग्रामपंचायत हद्दीत कळसुबाई शिखर येते. या भागातील नागरिकांनी सुद्धा एवढ्या लहान मुलीने हे शिखर सर केले नसल्याचे सांगितले आणि तिचे ग्रामपंचायत कडून सत्कार सुद्धा करण्यात आला. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करत असलेल्या गिर्यारोहक सागर पाटील यांनी सुद्धा अन्वीच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.