ठाणे -डोंबिवलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून अज्ञात व्यक्तीने ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोर हा तोंडावर मास्क ( attack on Jewelers owners Dombiwali ) घातलेला होता. हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या हल्ल्यात दुकान मालक गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर पसार झाला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
ज्वेलर्स मालकावर रुग्णालयात उपचार सुरु :डोंबिवलीतील आगरकर रोडवर मन्ना तारकनाथ यांचे मन्ना ज्वेलर्स नावाने दुकान आहे. (बुधवारी) दुपारच्या सुमारास मन्ना आपल्या दुकानात होते. याच दरम्यान एक अज्ञात हल्लेखोर दुकानात आला त्याचा चेहरा झाकलेला होता. त्याने मन्ना यांना चाकूचा धाक दाखवला. घाबरलेल्या दुकान मालक मन्ना यांनी प्रतिकार केला असता त्याने चाकूने मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात मन्ना गंभीर जखमी होताच हल्लेखोर तिथून पसार झाला. या हल्ल्यात मन्ना याना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.