कल्याण (ठाणे) - अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्याआधीच रस्त्यातच बंद पडल्याची घटना कल्याणातील बेतुरकर पाडा परिसरात घडली आहे. त्यामुळे आग विझविण्यासाठी जाणाऱ्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सोडून बंद पडलेल्या गाडीला धक्का मारत वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्याची वेळ आली. यावरुन कल्याण अग्नीशमन दलाच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका आणि आसपासच्या भागातील आगीच्या दुर्घटना पाहता अग्निशमन दलाच्या गाड्यासह जवान 24 तास सतर्क असतात. त्यातच अरुंद रस्त्यावर एखाद्या इमारतीत, चाळीत , दुकान, लघुउद्योग ठिकाणी आग लागल्यास घटनास्थळी तातडीने जाण्यासाठी कल्याणमध्ये महापालिकेने चार लहान अग्निशमन दलाच्या गाड्या ताफ्यात सामील केल्या. त्यातच कल्याण पश्चिम, बेतुरकर पाडा परिसरातील एका चाळीच्या वीज मीटरला आज (दि. 7 सप्टें) दुपारच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच एक अग्निशमन दलाची एक लहान गाडी घटनास्थळी रवाना झाली होती. मात्र, भररस्त्यात गाडीचा एक्सेल अचानक तुटल्याने गाडी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे गाडीत असलेल्या इटालियन तंत्रज्ञानाचे कुलिंग सिस्टमचे दोन बाटले जवानांनी दुचाकीवर घेऊन घटनास्थळ गाठले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग काही वेळातच आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.