ठाणे- सनम करोतीया या विवाहितेचा शुक्रवारी कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणी सनमचा पती बाबू ढकणी उर्फ सचिन करोतीयासह दीपक ठाकूर या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. सनमचे परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन हा खून केल्याची कबुली सचिनने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनैतिक संबंधांच्या संशयातून 'सनम'चा खून; मारेकरी पतीची धक्कादायक कबुली - कल्याण
सनम दुचाकीवर बसून कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरात आली. त्यानंतर ती अॅक्टिव्हा दुचाकीवर थांबलेली असताना सचिन त्याच्या मित्रासह दुचाकीने तिथे आला. त्याने सनमवर धारदार चाकूने वार केले. हे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले होते.
सनमचा कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी सायंकाळी दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या खुनाचा थरार सीसीटीव्हीत कैदही झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोघांपैकी एक मारेकरी बाबू ढकणीला तासाभरात अटक केली. त्याचा दुसरा साथीदार दीपक ठाकूरला शनिवारी बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून या हत्येमागील कारण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मृत सनमचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सचिनला होता. त्याचा राग मनात धरुन तिचा नवरा बाबु उर्फ सचिन करोतीयाने तिची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. आज या दोन्ही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, दोघांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.