कल्याण-डोंबिवली (ठाणे) -पक्ष स्थापनेपासून मनसेला कल्याण डोंबिवलीकरांनी साथ देत, दोन आमदारांसह २८ नगरसेवक सुरुवातीच्या काळात निवडून दिले. मात्र राज ठाकरेंच्या करिष्म्यामुळे मिळालेले राजकीय यश फार काळ स्थानिक नेत्यांना टिकवता आले नाही. त्यामुळे १० वर्षांतच मनसेला घरघर लागून कालच मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम हे मनसैनिकांची फौज घेऊन शिवसेनेच्या गोटात सामील झाले. तर आज मनसेचे गटनेते मंदार हळबे भाजपाच्या गळाला लागले आहेत. हे दोन्ही पक्षप्रवेश पाहता आगामी महापालिकेच्या निवडुकीत मनसेचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेपाठोपाठ भाजपाचाही मनसेला धक्के पे धक्का !..
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य युती फिस्कटल्यापासून शिवसेना - भाजपामध्ये विळ्या भोपळ्यासारखे वैर पाहावयास मिळत आहे. त्यातच महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला शिवसेनेने धक्का देत, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मनसेच्या एका बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश करून काही तासही उलटत नाहीत तोच मनसेचे अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे मनसेचे महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मंदार हळबे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेचे एक आक्रमक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून मंदार हळबे यांची ओळख आहे. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेते आणि गटनेते या पदांवर काम करताना आपल्या अभ्यासू कामाची छाप सोडली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हळबे यांनी भाजपविरोधात निवडणूकही लढवली होती. दरम्यान कालच मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. त्याला काही तासही उलटत नाहीत तोच हळबे यांनी मनसेला आणखी एक धक्का दिला आहे.
कल्याण - डोंबिवलीतील मनसेचे अस्थित्व नाहीसे होते कि काय ?
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असतानाच, गेल्या १० वर्षांपासून मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे युती तुटण्याआधी महापालिकेचे विरोधी पक्षपद मनसेकडेच होते. तर २०१० मध्ये मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. त्यांनतर २०१५ मध्ये ९ नगरसेवकच विजयी झाले. तर २०१९ च्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे डोंबिवलीतून निवडून आले. त्यानंतर मनसेची ताकद वाढणार असे बोलले जात होते. मात्र शिवसेना व भाजपमध्ये मनसेच्या स्थानिक नेत्यांसह माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने कल्याण - डोंबिवलीतील मनसेचे अस्थित्व नाहीसे होते कि, काय अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
..पण नियतीच्या मनात मनसेच्या बाबतीत काही वेगळेच-
मनसे स्थापनेनंतर २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसेचा महाराष्ट्रात एकही उमेदवार निवडून आला नसला तरी ठाणे जिल्हातील मनसेच्या उमेदवारांनी लाख-दीड लाखापेक्षा अधिक मतदान घेतल्याने मनसेची जिल्ह्याच्या राजकारणात तत्कालीन परिस्थितीत दखल घेण्यात येवू लागली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे महाराष्ट्राच्या विधानसभेत १३ आमदार निवडून गेले. त्यापैकी २ आमदार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून निवडून गेले होते. याच बळावर कल्याण डोंबिवली महापालिकेची सत्ता मिळविणासाठी मनसे नेत्यांनी भरपूर मेहनत घेतली. मात्र पालिकेत मनसेला सत्ता मिळाली नसली तरी, विरोधी पक्ष म्हणून आपला प्रभाव निर्माण करण्याइतपत मनसेने आपले नगरसेवक सभागृहात पाठविले होते. मनसेची ही वाटचाल पाहता मनसे जिल्ह्याच्या राजकारणात लगेच सत्ताधार्यांच्या भूमिकेमध्ये शक्य नसली तरी प्रभावी विरोधकांच्या भूमिकेत दिसणार असल्याचा आशावाद राजकीय क्षेत्रातून व्यक्त केला जावू लागला. पण नियतीच्या मनात मनसेच्या बाबतीत काही वेगळेच होते. भरतीच्या पाठोपाठ ओहोटी ही ठरलेलीच असते. हा निकष मनसेच्या बाबतीत राजकीय क्षेत्रात तंतोतंत लागू पडला. मनसेच्या ज्या गतीने राजकारणात शिखरे सुरूवातीच्या काळात पादाक्रांत करू लागली, त्याच वेगाने किंबहूना त्याहीपेक्षा अधिक वेगाने मनसेला अधोगती सुरू झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात मनसेची दिसून येणारी ताकद ही ताकद नव्हती, तर ती आलेली एक सुज होती हे काळाच्या ओघात स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे.