ठाणे- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवशी 560 रुग्ण आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण पाहवयास मिळाले आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून बुधवारी 350 रुग्णांनंतर गुरुवारी 560 नवे रुग्ण सापडले. चार रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 127 वर पोहोचली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या 7 हजार 485 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. मागील 21 दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीत सलग 13 दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढीने 200 चा आकडा पार केला. वाढणाऱ्या रुग्ण संख्येने काही दिवस सतत तीनशेचा आकडा पार केला होता. मात्र,शनिवार पासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारशेने वाढत होती. गुरुवारी रुग्णांच्या आकडेवारीने साडेपाचशेचा टप्पा पार केला. आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल 4 हजार 268 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.