ठाणे- कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यासह परिसरात उघड्यावर कचरा आणि घाण फेकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केडीएमसीने नेमलेले क्लिनअप मार्शल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे कोणतेही अधिकार नसतानाही हे 'क्लिनअप मार्शल' नागरिकांकडून त्याबाबतच्या दंडाची वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केडीएमसीत क्लीन मार्शलचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तर पोलीस अन्य तीन आरोपींचा शोध घेत आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसर कचरा आणि घाणमुक्त राहण्यासाठी केडीएमसीने याठिकाणी ठेकेदारामार्फत क्लिनअप मार्शल नियुक्त केले आहेत. स्टेशन परिसरातील रस्त्यावर पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणाऱ्या, थुंकणाऱ्या किंवा कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुलीचे प्रमूख अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. मात्र ही जबाबदारी सोडून हे क्लिनअप मार्शल कोरोनाबाबतचे नियम न पाळल्याच्या नावाखाली नागरिकांकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करत असल्याच्या तक्रारी मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांच्याकडे आल्या होत्या.