महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fake baba : भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली घातला ३२ लाखांचा गंडा - करणीची बाधा

एका भोंदूबाबाने जादूटोण्याची भीती दाखवून करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली एका महिलेला तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी प्रियांका योगेश राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पवन पाटील (वय 28 वर्षे, रा. गंजेवाडा, शनि चौक, भडगाव जि. जळगाव) या भोंदूबाबा विरोधात विविध कलमान्वये डेंबिवली पोलीस ठाण्यात (Dombivalii Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पोलीस ठाणे
डोंबिवली पोलीस ठाणे

By

Published : Jan 23, 2022, 3:34 PM IST

Updated : Jan 23, 2022, 4:40 PM IST

ठाणे - एका भोंदूबाबाने जादूटोण्याची भीती दाखवून करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली एका महिलेला तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी प्रियांका योगेश राणे ( वय 33 वर्षे रा. बाली रेसिडेन्सी, खारीगाव, कळवा ) या गृहिणीने डोंबिवली पोलीस ठाण्यात ( Dombivalii Police Station ) तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी पवन पाटील (वय 28 वर्षे, रा. गंजेवाडा, शनि चौक, भडगाव जि. जळगाव) या भोंदूबाबा विरोधात भा.दं,वि,चे कलम 420, 406, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (ख), 3 (1), (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले -पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर, 2019 पासून आजतागायत जळगाव जिल्ह्यातील गंजेवाड्यात राहणाऱ्या पवन बापुराव पाटील या भोंदूबाबाने तक्रारदार प्रियांका राणे यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला असलेल्या ओम साई सोसायटीत राहणाऱ्या राणे यांच्या आईची फसवणूक केली. प्रियांका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच या बाबाने कुणीतरी जादूटोणा करून करणी केल्याची भीती पीडित महिलेला घातली होती.

भोंदूबाबाने उकळले ऑनलाईनद्वारे लाखो रुपये -तंत्रमंत्राने करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या भोंदूबाबाने पीडित महिलेच्या व तिच्या आईच्या खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये 31 लाख 6 हजार 874 रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे पवन पाटील याने 32 लाख 15 हजार 874 रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका राणे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Jan 23, 2022, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details