महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवणीच्या आकोटमध्ये तरुण शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

राकेश हा अविवाहित असून आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा अकाली मृत्यूमूळे आई-वडिलांचा आधार गेल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे.

कालवा
कालवा

By

Published : Aug 1, 2020, 10:39 PM IST

भंडारा - पवनी तालुक्याच्या आकोट येथील तरुण शेतकऱ्याचा धान (भात) पिकाला पाणी देत असताना पाय घसरून कालव्यात पडल्यामुळे मृत्यू झाला.

ही घटना सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून तरुण शेतकऱ्याचा अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कालव्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू होण्याची ही या महिन्यातील दुसरी घटना आहे.

राकेश शंकर भुरे (वय 23 रा. आकोट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून सर्वत्र पेरणी आणि लावणीचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी उपलब्ध सिंचनाच्या सुविधांचा फायदा घेतात. मात्र, बरेचदा या सुविधा त्यांच्या जीवावर बेतात.

गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याजवळ राकेश भुरे यांची वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीमध्ये सध्या धानाची रोवणी झाली आहे. मात्र, मागील दहा दिवसांपासून पाऊस येत नसल्यामुळे शेतीतील पीक वाचविण्यासाठी राकेश हा त्याच्या काही सहकारी मित्रांसोबत शेताकडे आला. शेतीला पाणी द्यायचे म्हणून दोरीच्या साह्याने गोसे धरणाच्या कालव्यात उतरला. पाईप लावत असताना पाय घसरल्याने दोरीचा हात सुटून तोल गेला आणि कालव्यात बुडाला.

राकेश किंवा त्याच्या मित्रांना पोहता येत नसल्याने राकेश मित्रांदेखत पाण्यात बुडून मरण पावला. राकेश हा अविवाहित असून आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा अकाली मृत्यूमूळे आई-वडिलांचा आधार गेल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे. राकेशच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. कालव्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहेत.

या अगोदरही याच महिन्यात मोहाडी तालुक्यातील एका 55 वर्षे शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details