औरंगाबाद : सावंगी येथील तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्सुल तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण दशरथ निकम (वय .३१) नितीन विजय गायकवाड ( वय .२१) रा.हर्सुल, फकीरवाडी अशी तलावात बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी हर्सुल कचरा डेपोजवळ असलेल्या सावंगी तलावात मासे पकडण्यासाठी ते गेले. यावेळी मासे पकडत असताना अचानक तोल गेल्याने करण निकम हा पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी नितीन गायकवाडने पाण्यात उडी मारली; परंतु दुर्दैवाने दोघेही तलावात बुडाले. तेथे उपस्थित तरुणांनी हे पाहून आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच हर्सूल पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात बुडालेल्या दोन्ही तरुणांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. याप्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.