औरंगाबाद- दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याचे कळताच १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हनुमान नगरातील गल्ली नंबर-२ येथे राहणाऱ्या अनिकेत संजय शेळकेने (१६) आत्महत्या केली.
अनिकेत शेळके हा गजानन कॉलनीतील ज्ञानप्रकाश विद्यामंदिरमध्ये दहावीत शिकत होता. सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळलाताना निकालाचा विषय निघाल्यावर मित्रांनी टेन्शन घ्यायचे नाही, नापास झालो तर पुन्हा परीक्षा देऊ, अशी दिलासादायक चर्चा केली होती. अनिकेत घरी आल्यावर त्याच्या मोठया भावाने निकाल पाहिला. तेव्हा अनिकेत ५ विषयात नापास झाल्याचे सांगितले. त्यामुळे अनिकेत निराश होता. मात्र, घरात तो सर्वात लहान असल्याने आई, बहिणी आणि नातेवाईकांनी त्याला पुन्हा परीक्षा देऊन पास होण्याचा धीर दिला. मात्र, त्याने कोणाचीही न ऐकता टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सर्व झोपल्यावर केली आत्महत्या
घरातील सर्व सदस्यांनी जेवण केल्यानंतर दुपारी ते हॉलमध्ये झोपी गेले होते. तर, अनिकेत हा रूममध्ये गेला होता. काही वेळाने त्याने बहिणीच्या स्कार्फ पंख्याला बांधून गळफास घेतला. काही वेळाने मतदार नोंदणीसाठी एकाने घराचे दार वाजविले. तेंव्हा अनिकेतच्या आजीने त्या व्यक्तीस अनिकेतचे नाव नोंदविले का? असे विचारून त्याला आवाज दिला. मात्र, अनिकेतचा प्रतिसाद न मिळाल्याने आजी त्याला पाहण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. आजीने आरडाओरड केल्याने घरातील लोकांसह शेजार्यांनी धाव घेतली. त्यांनी, अनिकेतला फासावरून उतरविले, तेंव्हा त्याचा श्वास सुरू होता. त्याला डॉ. हेडगेवार रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, घाटीत आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अनिकेतच्या मोठ्या बहिणीचा गेल्या रविवारी साखरपुडा झाला. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, अनिकेतने आत्महत्या केल्याने हनुमाननगर भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.