औरंगाबाद- लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सुभाष पाटील यांनी औरंगाबादमध्ये खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार इम्तियाज जलील यांच्यात मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केलाय.
खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात 'मॅच फिक्सिंग' - सुभाष पाटील
आमदार इम्तियाज जलील आणि खासदार खैरे यांच्यात मॅच फिक्सिंग असून, दोघे मिळून छोट्या मोठ्या दंगली घडवायचे काम करतात, असा आरोप सुभाष पाटील यांनी केला.
मराठवाड्यात २७ कारखाने बंद पडले आहेत. २७ लाख युवक बेरोजगार झाले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि सरकार डिजिटल इंडियाची घोषणा करते. खासदार खैरेंच्या रस्ते, कचरा आणि पाण्याच्या ढिसाळ नियोजनामूळे अनेक उद्योग निघून गेले आहेत. आमदार इम्तियाज जलील आणि खासदार खैरे यांच्यात मॅच फिक्सिंग असून, दोघे मिळून छोट्या मोठ्या दंगली घडवायचे काम करतात, असा आरोप सुभाष पाटील यांनी केला.
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षातर्फे सुभाष पाटील यांच्या प्रचार सभेला पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या उपस्थितीत गजानन महाराज मंदिर परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐन वेळी नारायण राणे यांचा दौरा रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांनी सभा उरकली. सभेच्या ठिकाणी राणे यांनी सुभाष पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार आमदार हर्षवर्धन जाधव याना पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली. सुभाष पाटील हे शिवसेनेचे औरंगाबादचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी मराठवाडा विकास सेना स्थापन करत स्वतःचा पक्ष स्थापन केला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा पाठिंबा घेत सुभाष पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.