औरंगाबाद - मंगळवारी दिवसभर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागल्याचीही गोष्ट समोर आली आहे. (28 सप्टेंबर)रोजी एमएचटी-सीईटी परीक्षेला या पुरामुले अनेक विद्यार्थ्यांना जाता आले नाही. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे जटवाडाजवळ असलेला हर्सूल तलाव ओसंडून वाहत होता. पाण्याचा जोर इतका होता की, जटवाड्याकडून हर्सूल तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे त्या मार्गावर कोणालाही जाता येत नव्हते. अशा वेळेस त्या रस्त्यावर असलेल्या एव्हरेस्ट कॉलेज परीक्षा केंद्रावर होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना जाता आले नाही. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात या ठिकाणी परीक्षा होती. सकाळच्या सत्रात 300 पैकी 254 विद्यार्थी परीक्षेला हजर राहू शकले. तर, 46 विद्यार्थी परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. तर दुपारी दोन वाजता होणाऱ्या सत्रामध्ये परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दीड वाजता पोहोचणे गरजेचे होते. परंतु, पावसाचा जोर आणि हर्सूल तलावात ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ता बंद असल्याने, या केंद्रावर तीनशे विद्यार्थ्यांपैकी 131 विद्यार्थी पोहोचू शकले. 169 विद्यार्थी परीक्षेला जाऊ शकले नाहीत. त्याबाबत या मुलांची आणि परिस्थितीची माहिती सिटी सेलला पाठवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मराठवाड्यात अनेक विद्यार्थी मुकले परीक्षेला