मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात येत आहेत. यात राज्यातील वाइन शॉप उघडण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र, या परवानगीनंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर 4 मे रोजी खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत दारूची दुकाने सुरु न करण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यानंतर मुंबई, पुण्यात दारूमुळे झालेला गोंधळ पाहून त्यांनी अखेर 'औरंगाबादेत दारूची दुकाने खुली न करण्याची आपली भूमिका योग्य सिद्ध झाली' असे म्हटले आहे.
हेही वाचा...मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करत आहेत !
काय भुमिका घेतली होती खासदार जलील यांनी...
'दारू खरेदी करण्याएवढा पैसा ज्यांच्याकडे आहे, ते अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. त्यामुळे वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा,' अशी मागणी एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. तसेच त्यांनी 'उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या कामाचे आम्ही देखील कौतुक करत होतो. पण आता ते सगळे व्यर्थ गेले आहे' अशा शब्दात सरकारच्या निर्णयाचा विरोधही केला होता.
यानंतर औरंगाबादमध्ये कोणतेही दारूचे दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. याचे काटेकोर पालन करण्यात आले. मात्र, राज्यात इतरत्र झालेला गोंधळ पाहुन त्यांनी आपले मत कसे योग्य होते, याच उच्चार केला.
शेवटी माझी भूमिका योग्य सिद्ध झालीच...
खासदार जलील यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. 'मुंबईमध्ये दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शेवटी आमची भूमिका योग्य ठरली आहे. मात्र, दोन दिवसात आरोग्याच्या दृष्टीनं नेमकं किती नुकसान झालं असेल माहीत नाही' अशी चिंता जलील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.