औरंगाबाद - पीएम फंडातून राज्याला मिळालेल्या व्हेंटिलेटरवरून राज्यातील वातावरण तापले आहे. कारण राज्याला मिळालेल्या 4427 पैकी 875 व्हेंटिलेटर खराब निघाल्याने केंद्र विरोधात राज्य सरकार असे आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.
औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांच्याशी खराब व्हेंटिलेटरच्या मुद्यावरून आमचे प्रतिनिधी अमित फुटाने यांनी संवाद साधला... औरंगाबादेतील 50 व्हेंटिलेटर खराब -
पीएम केअर फंडातून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला 150 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये 50 व्हेंटिलेटर खराब असल्याचा अहवाल घाटी रुग्णालयाने राज्य सरकारला पाठवला आहे. त्यावरून खासदार इम्तियाज जलील आणि आमदार सतीश चव्हाण यांनी राज्य सरकारने संबंधित कंपनी विरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात निघाले 875 व्हेंटिलेटर खराब -
पुणे जिल्ह्याली 147 व्हेंटिलेटर मिळाले असून यापैकी 72 चालू असून 75 नादुरुस्त आहेत. अकोला जिल्ह्याला 70 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी 30 चालू असून 40 नादुरुस्त आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला 15 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी सर्व सुरू असले तरी ते अतिगंभीर रुग्णांसाठी ते वापरता येत नाहीत. जळगाव जिल्ह्याला 84 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी 77 चालू असून 7 बंद आहेत. हिंगोली जिल्ह्याला 97 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी 85 चालू असून 12 नादुरुस्त आहेत. नाशिक जिल्ह्याला 95 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी 31 चालू असून 64 नादुरुस्त आहेत. बीड जिल्ह्याला 193 व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी 94 चालू असून 99 नादुरुस्त आहेत. सुरू असलेल्या बहुतांश व्हेंटिलेटरमध्ये सॉफ्टवेअरची तांत्रिक अडचण आहेत, तर काही ठिकाणी साहित्य उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पीएम फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निकृष्ठ असल्याचा आरोप राज्य सरकार मधील मंत्री करताना दिसत आहे.
बहुतांश ठिकाणी व्हेंटिलेटर पडून असल्याने बिघडले -
राज्याला मिळालेले बहुतांश व्हेंटिलेटर हे चांगल्या स्थितीत आहेत. त्यात काही तांत्रिक अडचणी या येऊ शकतात. मात्र बऱ्याच ठिकाणी आलेले व्हेंटिलेटर हे अनेक दिवस पडून होते आणि त्यामुळे त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये, असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे व्यक्त केले होते. व्हेंटिलेटर बाबत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.