औरंगाबाद : वेळेवर उपचार न मिळाल्याने शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. या मृताची ओळख पटलेली नसून त्याला रुग्णालयात कुणी आणले याविषयीही काहीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
कुणीही दिले नाही लक्ष
याविषयी सविस्तर वृत्त असे की, औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरील पायरीवर पायाला जखम झालेला एक व्यक्ती पडलेला होता. या व्यक्तीच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या लागलेल्या होत्या. तसंच त्यावर माशाही घोंगावत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालय परिसरातील कुणीही या व्यक्तीकडे लक्ष देत नव्हते. याची माहिती मिळाल्यानंतर या व्यक्तीला उपचारांसाठी अपघात विभागात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. सदर व्यक्तीला कुणीतरी घाटीत सोडून गेल्याची शक्यता घाटी प्रशासनाने व्यक्त केली आहे. या व्यक्तीला ज्यांनीही घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. या व्यक्तीला के के ग्रुपच्या किशोर वाघमारे आणि सहकाऱ्यांनी अपघात विभागात दाखल केले. यानंतर डाॅक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.