औरंगाबाद : जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शनिवार आणि रविवार मात्र जिल्ह्यात पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन11 मार्च पासून रात्री बारा ते 4 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली लागू असणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सर्वसामान्य व्यवहार सुरू असतील. या काळात राजकीय-सामाजिक सभा, धार्मिक स्थळ आणि आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालये बंद असणार आहेत. त्यानंतरही रुग्ण वाढले तर लॉकडाऊन करण्याचा विचार होऊ शकतो.
विवाह सोहळ्यांवर निर्बंधगेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः विवाह सोहळ्यांमध्ये होणारी गर्दी प्रशासनासमोरील सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच 11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये आणि लॉन बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात शासकीय नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची मुभा देण्यात आली आहे. या काळातील कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील निर्बंध कसे असतील याची नियमावली ठरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
अस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांची दर पंधरा दिवसांनी तपासणीवेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना दर पंधरा दिवसांनी कोविड तपासणी करणं अनिवार्य असणार आहे. तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. याबाबत तपासणी करण्यासाठी वेगळी यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
11 मार्चपासून सात दिवस भाजी मंडई बंदकोरोना रुग्ण वाढीसाठी गर्दीची ठिकाणं कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच 11 मार्च पासून पुढील सात दिवसांसाठी जाधववाडी येथील मोठी भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सात दिवसांत तिथल्या व्यापाऱ्यांनी भाजी मंडईत गर्दी कमी करून कशा पद्धतीने व्यवसाय करता येईल किंवा कशा पद्धतीचे नियम लावून संसर्ग टाळता येईल याबाबत माहिती दिल्यास पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल. याशिवाय 11 मार्चपासून ते चार एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.