औरंगाबाद - कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात कोणालाही कामावरून कमी करू नये, असे आदेश राज्य आणि केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र औरंगाबाद महापालिकेच्या कामगार विभागाने चक्क बाराशे कंत्राटी कामगारांना कार्यमुक्त करण्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांच्या नोकरीवर टाच आली असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे.
कोरोनाचा धसका; महापालिकेच्या बाराशे कामगारांच्या नोकारीवर टाच, कुटुंबीयांची होणार उपासमार - औरंगाबाद महापालिका
औरंगाबाद महापालिकेच्या कामगार विभागाने चक्क बाराशे कंत्राटी कामगारांना कार्यमुक्त करण्याचे पत्र काढले आहे. प्राणिसंग्रहालय, उद्याने, वसुली अशा विविध भागात हे कर्मचारी कार्यरत आहेत.
कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे कामकाज बंद करण्यात आले आहे. त्यात पालिकेचे कामकाजदेखील बंद असल्याने विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फटका जवळपास बाराशे कामगारांना बसणार आहे. महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी कामगार काम करतात. प्राणिसंग्रहालय, उद्याने, वसुली अशा विविध भागात कार्यरत असलेल्या या कामगारांना कार्यमुक्त करण्याचे आदेश महापालिकेच्या कामगार विभागाने काढले आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांच्या नोकरीवर गदा येणार आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या विविध कामांवरदेखील परिणाम होणार आहे.
औरंगाबाद महापालिकेत रिक्त असलेल्या विविध जागांवर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तीन वेगवेगळ्या संस्थांमार्फत या कामगारांची भरती करण्यात आली आहे. पालिकेतील अनेक विभागात काम बंद असल्याने या कंत्राटी कामगारांचे काम बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोणालाही कामावरून काढू नये, असे आदेश असताना पत्र काढण्यात आले. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांना पालिकेच्या कामगार विभागाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. काढलेल्या पत्रानंतर सर्वत्र पालिकेवर टीका झाल्याने याबाबत आयुक्तांशी चर्चा करून आदेश रद्द करण्याचा सूचना देऊ, असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहे.