हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबादमधून उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे औरंगाबाद मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे. विद्यमान खासदार खैरे यांच्यासह आता ३ आमदार लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
आमदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद-मध्य मधून एमआयएमच्या तिकाटावर विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी मध्य विधानसभा मतदार संघातून माजी आमदार तथा शिवसेना नेते प्रदिप जैस्वाल यांचा पराभव केला होता. आमदार जलील यांना ६१, ८४३ मते मिळाली होती. तर जैस्वाल यांना ४१ ८६१ मतदारांनी कौल दिला होता.
औरंगाबाद लोकसभा : एमआयएमकडून आमदार जलील रिंगणात, ओवैसींची घोषणा
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत दिग्गजांनी आपली उडी घेतली आहे. युतीने विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच कायम ठेवत तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा लढवण्यासाठी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमने औरंगाबाद आणि मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभे करण्याचे सूचवले होते. वंचित बहुजन आघाडी राज्यातील ४८ मतदार संघातून उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे पुन्हा युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. पक्षातूनच विरोध होत असल्याने खैरे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे आघाडीने आमदार सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आघाडीच्या गोटात सध्यातरी संभ्रम आहे. दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीने जलील यांना उमेदवारी जाहीर केल्याने युती आणि आघाडीसमोर कडवे आव्हान उभे असल्याचे दिसून येत आहे.