औरंगाबाद - राज्यातील शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत निर्णय घ्या अन्यथा 23 ऑगस्ट पासून स्वयं नियमावली तयार करून शाळा आणि कोचिंग क्लास सुरू करू, असा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिला.
भाजपाप्रणित संघटना आक्रमक
मागील दीड वर्षांपासून शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कोचिंग क्लासचालकांचे नुकसान होत आहे. याबाबत भाजपा प्रणित कोचिंग क्लासेस संघटना आक्रमक झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कोचिंग क्लास सुरू करण्यास परवानगी द्या, अन्यथा विनापरवानगी वर्ग सुरू करू, असा इशारा यावेळी देण्यात आला होता.
'ऑनलाइनमुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान'
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहरीभागात ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करा, अशी मागणी बागडे यांनी केली. इतकेच नाही तर सोमवारपर्यंत शाळा उघडण्याबाबत निर्णय जाहीर करा, एकतर परवानगी द्या अन्यथा नाही म्हणा, उत्तर दिले नाही तर स्वयं नियमावली तयार करून शाळा आणि कोचिंग क्लास सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला.