औरंगाबाद - शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात पुन्हा वातावरण तापले आहे. शासनाच्या जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख झाल्याने MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी सेनेवर निशाणा साधला आहे. तर खैरे यांनी जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शहराचे नाव बदलण्यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.
प्रतिक्रिया देताना खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे - या कारणामुळे नामांतराचा प्रश्न पेटला -
राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबाबत त्याचा जीआर काढण्यात आला आहे. राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अदार पुनावाला यांच्यासह कोरोना लस उत्पादकांशी साधला संवाद
- हिम्मत असेल तर नाव बदलून दाखवा - खासदार जलील
राज्य शासनाच्या जीआरमध्ये औरंगाबादचा स्पष्ट संभाजीनगर उल्लेख करण्यात आलेला आहे. यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी असे केले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अथवा सरकारमध्ये हिम्मत असेल तर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करून दाखवावे. शिवसेना अनेक वर्षांपासून भावनिक राजकारण करत आहे. निवडणूक आली की तोच मुद्दा काढला जातो, तुम्ही नागरिकांना सांगितले आहे ना तर करून दाखवा, असे आव्हान देखील इम्तियाज जलील यांनी सरकारला दिले आहे.
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे प्रत्युत्तर -
खासदार इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर देत असताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमच्यात हिम्मत आहे म्हणून आम्ही शहराचे नाव संभाजीनगर केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आदर सर्व पक्षांना आहे. भाजप विरोध करणार नाही, मनसेने तर या मागणीसाठी आंदोलनसुद्धा केले, राष्ट्रवादी देखील विरोध करणार नाही. त्यामुळे त्या औरंग्याचे नाव बदलणार आहोत. विरोध करणाऱ्या एमआयएमची अवस्था बघा, त्यांचे आठ नगरसेवक पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले आहेत. कारण हा एकटाच मज्जा मारतोय, अशी टीका खैरे यांनी केली.
हेही वाचा -आमच्याकडे तक्रारदार गायब असूनही खोदून-खोदून चौकशी- उद्धव ठाकरेंचा परमबीर सिंगसह केंद्राला टोला