औरंगाबाद - राज्यात युतीची पायाभरणी करणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे दोन नेत्यांच्या स्मारकावरून युतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी देखील झाडे कापली जाणार असल्याचे समोर आले आहे. मात्र, कोणत्याही स्मारकासाठी झाड कापली जाणार नाही, अशी भूमिका औरंगाबाद महानगर पालिकेने स्पष्ट केल्याने आता औरंगाबादेत सेना-भाजपात स्माराकारावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
स्मारक वाद उफाळण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल केली जाणार असल्याची ओरड भाजपने केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यावर सोशल मीडियावर टीका करत शिवसेनेला जाब विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्मारकासाठी झाडे तोडली जाणार नाहीत, हे जाहीर केल. मात्र, त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी सिडकोने महानगर पालिकेकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. आता स्मारकासाठी झाडांची कत्तल केली जाणार नाही त्यामुळे स्मारकांच्या मुद्द्यावरून सेना-भाजप समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा -'आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं', 'तान्हाजी'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित
औरंगाबादच्या दुध डेअरीच्या जागेवर भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे याचे स्मारक वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मुंडे याचे स्मारक करण्यासाठी सिडकोने ११० झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. दुध डेअरीच्या जागेवर मोठ स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. भव्य अश्या स्मारकात २७५० चौरस ऑडीटोरीअम, ११०० चौरसचा मल्टीपर्पज हॉल, दोन मजली ११०० चौरसचा म्युजियम, २५० चौरस -प्रशिक्षण केंद्र आणि ग्रंथालय, २५० चौरस हॉटेल, २५० चौरस व्हीआयपी लाउंज, पाच व्हीआपी सूट, पाच खोल्या असा प्रस्ताव आहे. या स्मारकाचे काम सिडको प्राधिकरणाला देण्यात आले आहे. या स्मारकासाठी ११० झाडे तोडण्याची परवानगी सिडको ने महानगर पालिकेला मागितली आहे. मात्र. ही परवानगी देण्यास महानगर पालिकेने असमर्थता दर्शवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्मारकासाठी झाडे तोडली जाणार नाहीत. त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक झाडे न तोडता तयार करण्यात यावे असे मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - कुस्तीप्रेमींसाठी खुशखबर..! ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यात
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे आमचे नेते आहेत. दोघांचे देखील स्मारक व्हायला पाहिजे, मात्र त्यासाठी झाडे न तोडता स्मारक निर्माण झाली पाहिजे. असे देखील नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केले. मात्र, गोपीनाथ मुंडे याच्या स्मारकासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात आम्ही दहा पट झाड लाऊ अशी भूमिका वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष भागवत कराड घेतली आहे. आरे कार शेड बाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत निसर्गप्रेमींना खुश केल आहे. या निर्णयाने भाजप चांगलीच नाराज झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेल्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मराकासाठी झाडे कापली जाणार हा मुद्दा घेऊन भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले आहे. दरम्यान, आता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडे कापण्यासाठी परवानगी मागितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे राज्यात स्मारकांचा मुद्दा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - राज्यातील खासगी शाळांमधून कला शिक्षक होणार कायमचे हद्दपार?