औरंगाबाद- आजकाल सर्वकाही ऑनलाईन मिळत असल्याने अनेक जण आपल्याकडील उत्पादन विकण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. मात्र मेव्हणीच्या गर्भातील बाळ ऑनलाईन विकायला काढल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निकिता खडसे व शिवशंकर तांगडे या दोघांविरुद्ध क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवशंकर तांगडेला ताब्यात घेतले आहे. मूल जन्माच्या आधीच दत्तक देण्याच्या नावाखाली चार लाखाला विकायला काढल्याचा प्रकार सायबर सेलने उघडकीस आणला आहे.
धक्कादायक; गर्भातील बाळाच्या विक्रीची सोशल मीडियावर ऑनलाईन जाहिरात, पोलिसांनी उधळला डाव - फेसबुक
आजकाल सर्वकाही ऑनलाईन मिळत असल्याने अनेक जण आपल्याकडील उत्पादन विकण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. मात्र, ऑनलाईन बाळ विकायला काढल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी फेसबुकवरील आपल्या खात्यात एक संदेश पाठवला होता. शिवशंकरने त्याच्या संदेशात म्हटले होते, की त्याची मेहुणी सात महिन्यांची गरोदर असून तिला तिच्या नवऱ्याने सोडले आहे. तिचे दुसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे मेहुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते विक्री करायचे आहे. त्याबदल्यात पैशांचीही त्याने मागणी केली होती. शिवाय निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी पीपल अॅडॉप्शन ग्रुपमधून दत्तक मूल घेऊ इच्छिणाऱ्यांची यादी देखील मिळवली होती. त्यातील काहींशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करुन आर्थिक व्यवहाराची चर्चाही केली होती. जन्माला येणाऱ्या बाळाची किंमत चार लाखांपर्यंत सांगण्यात आली होती.
ऑनलाईन बाळ विकायला काढल्याची बाब महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांना समजली. त्यांनी याबाबत क्रांतिचौक पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर शिवशंकर तांगडेचा पत्ता सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी व त्यांच्या पथकाने शोधला. शिवशंकर तांगडे हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आहे. सध्या तो औरंगाबादजवळील रांजणगावातील शेणपुंजी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर सेल पोलिसांनी सापळा रचून शिवशंकर तांगडेला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.