औरंगाबाद - २० एप्रिलनंतर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मात्र, औरंगाबादमध्ये लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले आहे. आज पासून दुपारी दीड ते सकाळी पाच पर्यंत शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
औरंगाबादेत दुपारनंतर 'कडक संचारबंदी' संचारबंदीच्या या काळात औषधांची सेवा सुरू राहणार असून कोणतेही व्यवहार होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांनी आता पोलिसांकडे बाहेर पडण्यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
औरंगाबादेत दुपारनंतर 'कडक संचारबंदी' रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध कडक करण्याची चर्चा झाली. लॉक डाऊनच्या काळातही अनेक ठिकाणी लोक घराबाहेर रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दुपारी दीड ते रात्री अकरा पर्यंत सक्तीची संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे दुपारी दीडनंतर औषधी दुकान वगळता कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
बंदच्या काळात बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही ठिकाणी व्यवहार सुरू होणार आहेत. पुढील दोन दिवसांनी आढावा घेऊन आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.