Aurangabad RTO : वाहन चालकांनो सावधान, मास्क घातला नाही तर दंडाची पावती येईल घरी - सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता औरंगाबाद शहरात काही नवीन नियम लावण्यात येत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर आरटीओची (Aurangabad RTO) मदत घेऊन दंडाची पावती थेट घरी पाठवली जात आहे.
Aurangabad RTO
औरंगाबाद -ओमायक्रॉनचा धोका पाहता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यात मास्क न घालता वाहन चालवणाऱ्या चालकाला ऑनलाइन दंड लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आरटीओची (Aurangabad RTO) मदत घेऊन दंडाची पावती थेट घरी पाठवली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनो सावधान रहा आणि मास्क घाला असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सीसीटीव्ही माध्यमातून लागणार दंडवाहतुकीचे निमय मोडणाऱ्याला इ चलन दिलं जातं. सिग्नल वर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर त्यासाठी केला जातो. गाडीचा नंबर प्लेट वरून गाडीच्या मालकाला दंडाची पावती पाठवली जाते. तीच पद्धत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर वापरली जात आहे. ज्यामध्ये मास्क न घालणाऱ्या नागरिकांच्या गाडीचा नंबर प्लेट वरून नागरिकांना घरपोच दंडात्मक पावती ही पाठवली जात आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना जर मास्क वापरला नाही तर सीसीटीव्ही मुळे दंडाची पावती थेट घरपोच मिळणार आहे.
शहरात पुन्हा सुरू झाले कोरोना तपासणी केंद्र
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता शहरात काही नवीन नियम लावण्यात येत आहेत. त्यात कोरोना काळात सुरू करण्यात आलेले तपासणी केंद्र रुग्ण संख्या कमी झाल्याने बंद करण्यात आले होते, ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. शहरात वर्दळीच्या ठिकाणी कोविड तपासणी केली जाणार आहे. त्यात शॉपिंग मॉल मध्ये तापसणीवर भर देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Last Updated : Jan 2, 2022, 12:29 PM IST