औरंगाबाद - क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तरुणाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास जालना रोडवरील अपना बाजार परिसरातील यमी-यमी चायनीज स्टॉल येथे घडली. याप्रकरणी टोळक्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश देवेंद्र गंगवाल असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश देवेंद्र गंगवाल (२८, रा. राठी संसार, रो-हाऊस, जाधववाडी, सनी सेंटर) असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. संदेश गंगवाल हे रात्री साडे अकराच्या सुमारास जालना रोडवरील अपना बाजार येथील यमी-यमी चायनीज स्टॉल येथे गेले होते. त्यावेळी गंगवाल व याग्निक पटेल यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर याग्निक पटेल याने आठ ते दहा जणांना बोलावून घेत गंगवाल यांना शिवीगाळ व बेदम मारहाण केली. तसेच कार्यालयातील काचेवर ढकलले. त्यांच्यातील वाद वाढत गेल्यानंतर टोळक्याने गंगवाल यांना इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिले.
हेही वाचा-Pune Crime : 'भामटेगिरी' सोडून 'भाईगिरी' करण्याकडे वळली पुण्याची गुन्हेगारी!
तरुणाचे प्राण थोडक्यात वाचविले-
सुदैवाने गंगवाल यांनी गॅलरीचे ग्रील पकडून ठेवल्यामुळे त्यांचा जीव वाचला. यावेळी टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंगवाल यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखम गंभीर असल्याने गंगवाल यांना टाके पडले आहेत.