औरंगाबाद -अनिल देशमुखांना पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्याची माफी मागावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान राज्यातील दोन मंत्री गेले आता अनिल परब यांच्यासह आणखी मंत्री लवकरच घरी जातील असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
सचिन वाझे प्रकरणात दोन हजार कोटींपेक्षा जास्त वसुली
सचिन वाझे प्रकरणातील वसुली दोन हजार कोटींपेक्षा जास्त आहे. टीआरपी घोटाळ्यात अस्तित्वात नसलेली वाहिनी दाखवून घोटाळा केला गेला. त्याचबरोबर वसुली बुकींकडून केलेली वसुली, पोलीस दलात बदलीसाठी झालेला घोटाळा. या विविध मार्गांनी ही वसुली झाली आहे. मात्र या घोटाळ्याचे नेमके लाभार्थी कोण? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. अनिल देशमुख ते एकटे होते का? त्यांच्याबरोबर कोण होते याचाही जाब आता विचारला पाहिजे. अनिल परब हे गृहनिर्माण सोबत गृह खातं देखील चालवत होते, असा आरोप देखील किरीट सोमैया यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.