औरंगाबाद -कोरोनामुळे रोजगार गेले, उदरनिर्वाह करणे अवघड झाले. त्यात आई, बायको दोन मुलं असा परिवार सांभाळणे कठीण झाले. मुलाचे होणारे हाल पाहता आईने वृद्धाश्रमात जाण्याचा मार्ग निवडला आणि मुलाने चक्क आईला सांभाळणे शक्य नाही, तुम्हीच सांभाळा अशी चिठ्ठी लिहून मोकळा झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे मातोश्री वृद्धाश्रमात..
हातात पत्र घेऊन आई पोहचल्या पोलीस ठाण्यात -
गेल्या काही दिवसांपासून 64 वर्षीय आजी औरंगाबादच्या पैठण रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रम येथील व्यवस्थापक सागर पागोरे यांच्याकडे मला वृद्धाश्रमात भरती करून घ्या, अशी विनंती करत होत्या. मात्र नियमाने नातेवाईक किंवा पोलिसांमार्फत प्रवेश दिला जाईल असे सांगितले. त्यामुळे हातात मुलाने लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन या आईने पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या मदतीने ही वृद्ध आई मातोश्री वृद्धाश्रमात दाखल झाली.
वृद्धाश्रमात दाखल आईशी बातचीत करताना प्रतिनिधी कोरोनामुळे मुलगा आला अडचणीत -
मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे मुलाचा रोजगार गेला. या वृद्ध आईचा एकुलता एक मुलगा पुण्यात कोर्टात पुस्तक विकायचं काम करत होता. कोरोनामुळे न्यायालयात कोणालाच प्रवेश मिळणार नाही, अशी सूचना मिळाली आणि पुस्तक विक्रीचा व्यवसाय बंद झाला. त्यात सुनेसोबत सारखे होणारे वाद यामुळे कौटुंबिक स्थिती खराब झाली. त्यामुळे आईने वृद्धाश्रमात जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपल्या कुटुंबाला सोडून त्या मातोश्री वृद्धाश्रमात दाखल झाल्या.
मोठ्या संघर्षाने घडवले मुलाला - या वृद्ध मातेचे आयुष्य संघर्षमय राहिले. मुलगा लहान असताना पतीने दुसरा विवाह केला व ते दुसऱ्या पत्नीसोबत राहू लागला. हातमाग विभागात पती कामाला असूनही लोकांचे कपडे शिवण्याचे काम या आईला करावे लागले. लोकांचे कपडे शिवत आईने एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले, त्याचे शिक्षण आणि विवाह आईने लावून दिला. विवाहानंतर सुनेसोबत होणाऱ्या वादामुळे मुलाने आईला वेगळी खोली करून दिली. तिथेच मेस लावून दिली. मात्र कोरोनामुळे मुलाची आर्थिक स्थिती ढासळली आणि त्याने आईला सांभाळू शकत नाही, असे पत्र देऊन आईला वृद्धाश्रमात राहण्यास सांगितले.
मुलांचे चांगले व्हावे ही केली कामना -
हातात पत्र देऊन आईला वृद्धाश्रमात पाठवलं असले तरी माझा मुलगा चांगला आहे. मात्र त्याची परिस्थिती वाईट असल्याने त्याने हा निर्णय घेतला. परिस्थिती चांगली झाली की तो पुन्हा मला नेईल, असा विश्वास या आईने व्यक्त केला. मी आता येथे आरामात राहीन, त्याचं सर्व चांगलं व्हावं. त्याचं कुटुंब त्याने चांगल्या पद्धतीने सांभाळावे, अशी कामना या आईने व्यक्त केली. त्यामुळे आई आईच असते याचा प्रत्यय औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमात पाहायला मिळाला.
या 64 वर्षीय आईवर ओढावलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..